रशिया - युक्रेनच्या युद्धामुळे केळीची निर्यात रोडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 10:36 IST2022-04-19T10:35:01+5:302022-04-19T10:36:22+5:30
शहादा, शिरपूर, सोलापूर, नांदेड, गुजरातमधूनही केळी मालाची आवक वाढल्याने व उन्हाळी रसाळ फळांची बाजारपेठेत मागणी वाढल्याने केळीच्या बाजारपेठेत घसरण निर्माण झाली आहे.

रशिया - युक्रेनच्या युद्धामुळे केळीची निर्यात रोडावली
रावेर : उन्हाळ्यातील अति उष्ण प्रतिकूल तापमानात अघोषित लोडशेडिंगच्या दाहकतेत कापणी वरील केळी तगवण्यासाठी शेतकरी रक्ताचे पाणी करून धडपडत आहे. असे असले तरी दुसरीकडे खरबूज - टरबूज, काकडी सारख्या उन्हाळी व रसाळ फळांनी बाजारपेठेत आक्रमण केल्याने तथा अमेरिकन राष्ट्र असलेल्या कोस्टारिकाची रशियाने नाकारलेली केळी इराणमध्ये येऊन धडकल्याने भारतीय केळीची निर्यात रोडावली आहे. यामुळे केळीच्या बाजारपेठेत काही अंशी घसरण झाली आहे.
शहादा, शिरपूर, सोलापूर, नांदेड, गुजरातमधूनही केळी मालाची आवक वाढल्याने व उन्हाळी रसाळ फळांची बाजारपेठेत मागणी वाढल्याने केळीच्या बाजारपेठेत घसरण निर्माण झाली आहे. परिणामतः आज दीड ते दोन हजार रूपयांच्या दरम्यान बाजारभाव असणे अपेक्षित असताना ९०० ते ११०० रुपये प्रति क्विंटल भावाने केळीची खरेदी सुरू आहे.
दुसऱ्या बाजूला रशिया व युक्रेन दरम्यानच्या युद्धामुळे रशियाने अमेरिकन राष्ट्र असलेल्या कोस्टारिकाची केळीची आयात पूर्णत : थांबवली आहे. परिणामतः कोस्टारिकात संचित झालेली केळी मिळेल त्या भावात इराणमध्ये दाखल होत असल्याने ऐन रमजान महिन्यात भारतातून अरब राष्ट्रांत निर्यात होणाऱ्या केळीचे प्रमाण रोडावले असल्याने निर्यात अभावी स्थानिक बाजारपेठेवर रशिया - युक्रेन युद्धाचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत.
भविष्यात हज यात्रेतील ३० लाख भाविकांची गर्दी यंदा उसळणार असल्याने केळीच्या बाजारपेठेत ‘ ब्रेक के बाद’ केळी भावात उसळी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
...तर भारतीय केळीला रशियात निर्यातीची मोठी संधी
रशिया - युक्रेनच्या युद्धामुळे रशियाने अमेरिकन राष्ट्र असलेल्या कोस्टारिकाची केळी आयात थांबवली असल्याने, रशियात केळी निर्यातीची भारताला मोठी संधी चालून आली आहे. त्यादृष्टीने खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील व बऱ्हाणपूरचे खासदार ज्ञानेश्वर पाटील यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन परराष्ट्र मंत्रालयातून तत्संबंधी सकारात्मक निर्यात धोरणाबाबत तगादा लावण्याची गरज आहे.
केळीची सर्वच प्रांतात आवक वाढली असल्याने व मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत असल्याने व केळी मालाची एकंदरीत आवक वाढल्याने केळी भावात काहीअंशी घसरण झाली आहे
- विशाल अग्रवाल, संचालक, रूची बनाना एक्सपोर्ट, रावेर.
केळीची आवक वाढल्याने व बाजारपेठेत मागणी घटली असल्याने केळी भावात घट निर्माण झाली आहे. त्यात किसान रॅक आठवड्यात तूर्तास बंद करण्यात आल्याने बीसीएन रेल्वे रॅकचा वाढता फटका बसला आहे.
- विनायक महाजन, विजय केला एजन्सी, रावेर
रशिया - युक्रेनच्या युद्धामुळे केळी निर्यातीवर परिणाम झाला आहे. तद्वतच, केळी मालाची मोठ्या प्रमाणात उपलब्धता झाल्याने तथा टरबूज-खरबूजची मागणी वाढल्याने केळी भावात घसरण झाली आहे.
- किशोर गणवानी, केळी निर्यातदार, रावेर
कोस्टारिका हे अमेरिकन राष्ट्र असल्याने रशियाने तेथील केळी आयात थांबविल्याने कोस्टारिकाची केळी इराणमध्ये निर्यात झाली आहे. त्यामुळे इराणमध्ये आपल्याकडून होणाऱ्या केळी निर्यातीवर परिणाम झाला आहे. मात्र, रशियाने आपल्या केळी निर्यातीला हिरवी झेंडी दिल्यास मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.
- सदानंद महाजन, संचालक महाजन बनाना एक्सपोर्ट, तांदलवाडी.