नदी पात्रातील लव्हाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST2021-07-24T04:12:11+5:302021-07-24T04:12:11+5:30
राजकारणात दूर गेलेल्यांना जवळ करण्यासाठी कोण काय प्रयत्न करेल, हे सांगता येत नाही. जामनेरचे माजी नगराध्यक्ष गेल्या काही ...

नदी पात्रातील लव्हाळी
राजकारणात दूर गेलेल्यांना जवळ करण्यासाठी कोण काय प्रयत्न करेल, हे सांगता येत नाही. जामनेरचे माजी नगराध्यक्ष गेल्या काही वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून अलिप्त आहेत. ते प्रत्यक्ष निवडणूक लढवित नसले तरी कुणाला तरी पाठिंबा देतात. कधी स्वपक्षीयांना तर कधी विरोधकांना. त्यांचा राजकीय गोतावळा मोठा आहे. मोठ्या नेत्यांचे पाठीराखे असल्याने त्यांच्या शब्दाला किंमत आहे. येत्या दोन वर्षात नगरपालिकेची निवडणूक होईल. त्याची तयारी सत्ताधारी व विरोधक करीत आहेत. माजी नगराध्यक्षांनी पुन्हा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी व नेतृत्व करावे, अशी काहींची इच्छा आहे. नुकताच त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनातील इच्छा बोलून दाखविली. त्यांनी याला नाही म्हटले नसले तरी होकारही दिला नाही; मात्र त्यांनी जे म्हटले ते फारच सूचक होते. नदीला पूर येतो, बरेच पाणी वाहून जाते; मात्र पात्रातील लव्हाळी आहे तिथेच राहते. आपण लव्हाळीसारखे आहोत. जामनेरचे राजकारण फार विचित्र आहे. दिवसभर कुणाच्या तरी प्रचारात फिरणारे कधी तरी कुणाकडे कांदे पोहे घेताना दिसतात. त्यामुळे निवडणूक काळात कोण कुणाच्या झोळीत जाऊन बसेल, हे सांगणे कठीण आहे. राजकारणातील सुपारी दाताने तुटत नाही, हे लक्षात येताच अडकित्त्याचा वापर करणारेदेखील मतदारांनी पाहिले आहेत.