रासपच्या युवती जिल्हाध्यक्ष ज्योती भोई यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 21:42 IST2020-08-10T21:41:59+5:302020-08-10T21:42:08+5:30
खळबळ : घटनेमागील कारण गुलदस्त्यात

रासपच्या युवती जिल्हाध्यक्ष ज्योती भोई यांची आत्महत्या
अमळनेर : राष्ट्रीय समाजवदी पक्षाच्या युवती जिल्हाध्यक्षा ज्योती धनराज भोई यांनी स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १० रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास शहराच्या पैलाड भागात घडली. या घटनेमागील कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.
गेल्या काही दिवसांपासून ज्योती भोई यांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार केल्याने व त्यावरुन गुन्हा दाखल झाल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. त्या धाडसी स्वभावाच्या होत्या.काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील एका महिलेशी त्यांचे भांडण झाले होते. त्यांनी अचानक आत्महत्या केल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्याजवळ सुसाईड नोट सापडल्याची चर्चा शहरभर पसरली होती मात्र या संदर्भात तपासाधिकारी सहा. पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर याना विचारले असता त्यांनी फक्त तपास सुरु आहे असे उत्तर दिले
याबाबत समाधान भोई यांनी अमळनेर पोलिसात खबर दिली की, त्यांचे चुलत बंधू भगवान विठ्ठल भोई यांनी सांगितले की, ज्योती हिने घरातील जिन्याच्या रेलिंगला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. या खबरीवरुन अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयात तिचे शव विच्छेदन करण्यात आले असून तपास प्रकाश सदगीर करीत आहे.