विधानपरिषद पोटनिवडणूक: राष्ट्रवादीच्या बैठकीत जैन व पाटील यांच्या नावावर चर्चा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}} जळगाव : विधानपरिषदेची पोटनिवडणूक लढण्यासाठी माजी आमदार मनीष जैन यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर या भाजपाच्या उमेदवार असतील, या वृत्तास खुद्द एकनाथराव खडसे यांनी दुजोरा दिला आहे.
विधान परिषदेच्या मागील निवडणुकीत मनीष जैन यांनी खडसे यांचे पुत्र निखील यांचा पराभव केला होता. तेव्हापासून खडसे आणि जैन यांच्यात राजकीय भांडण सुरू झाले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना मनीष जैन यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे हरिभाऊ जावळे यांची उमेदवारी केंद्रीय निवड समितीने जाहीर केलेली असताना ती मागे घेण्यात आली होती. निवडणुकीत जैन यांचा रक्षा खडसे यांनी पराभव केला.
आता विधानपरिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. भाजपाच्या उमेदवारीबाबत एकनाथराव खडसे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले, अजून उमेदवार निश्चित झालेला नाही. डॉ.गुरुमुख जगवानी, अनिल चौधरी, गोविंद अग्रवाल, संजय जैन यांची नावे पुढे आली आहेत. परंतु राष्ट्रवादीतर्फे मनीष जैन उमेदवार असल्यास त्यांच्या विरोधात भाजपातर्फे रोहिणी खडसे-खेवलकरांना उमेदवारी द्या, असे संदेश कार्यकर्ते भ्रमणध्वनी वर मला पाठवित आहेत. पुढे काय होते ते बघू, असे सूचक वक्तव्य खडसे यांनी 'लोकमत'शी बोलताना केले.
दोन दिवसात निर्णय
भाजपाच्या कोअर कमिटीने विधानपरिषदेच्या उमेदवारीसंबंधीचा निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथराव खडसे व आमदार गिरीश महाजन यांच्यावर सोपविलेला आहे. परंतु अद्याप या दोन्ही नेत्यांची चर्चा झालेली नाही. दोन दिवसात निश्चित होईल.
अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक
अँड.रवींद्र पाटील किंवा मनीष जैन यांना उमेदवारी देण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथे आज राष्ट्रवादी भवनात बैठक घेतली. त्यात पालकमंत्री संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, राजीव देशमुख, दिलीप वाघ, मनीष जैन, अँड.रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. २३ रोजी जैन किंवा अँड.पाटील यापैकी एकाच्या नावाची घोषणा होईल, असे पवार यांनी स्पष्ट केल्याची माहिती मिळाली.