सॅनिटाईजशिवाय प्रवेश न देणारा रोबोट आला आकाराला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:21 IST2021-09-05T04:21:29+5:302021-09-05T04:21:29+5:30

जळगाव : कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी सर्वांनाच सॅनिटायझेशनची सवय लागावी, वर्गखोल्या काही क्षणात सॅनिटाईझ करणे, मोबाईल चार्जिंग करणे असा ...

The robot that does not give access without sanitation came to shape | सॅनिटाईजशिवाय प्रवेश न देणारा रोबोट आला आकाराला

सॅनिटाईजशिवाय प्रवेश न देणारा रोबोट आला आकाराला

जळगाव : कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी सर्वांनाच सॅनिटायझेशनची सवय लागावी, वर्गखोल्या काही क्षणात सॅनिटाईझ करणे, मोबाईल चार्जिंग करणे असा बहुउपयोगी रोबोट जळगावच्या दोघा विद्यार्थ्यांसह इतर शहरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. याचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे सॅनिटाईज केल्याशिवाय हा रोबोट पुढे प्रवेशच देणार नाही. विशेष म्हणजे पेटंटसाठीदेखील नोंद करण्यात आली आहे.

कोरोनाची स्थिती पाहता अद्यापही शाळा व महाविद्यालय सुरू होऊ शकलेले नाही. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे वर्गखोल्यांना सॅनिटायझेशन करणे हे खूप अवघड आहे. ही समस्या लक्षात घेता कमीत कमी वेळेमध्ये वर्गखोल्या सॅनिटायझेशन करण्यासाठी जळगावच्या तुषार जैन, भूपेश पाटील, नाशिक येथील प्रसाद रहाणे, औरंगाबादचा प्रसाद गावंडे व जालना येथील अभिजित बेळीकर, सोनू मोरे, शुभम कुंडलवाल या द्वितीय वर्ष यंत्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी हा रोबोट तयार केला आहे.

रुग्णाला औषधीही देता येणार

रोबोटवरील हाताद्वारे हा रोबोट बेंचेसच्या खाली किंवा कोणत्याही कानाकोपऱ्यात सॅनिटायझर स्प्रे करतो. तसेच या हाताचा उपयोग रुग्णाला औषधी देण्यासाठी सुद्धा करता येऊ शकतो. ज्यांनी सॅनिटाईज करून घेतले तोच विद्यार्थी वर्गामध्ये प्रवेश करू शकतो, अशी यंत्रणा या रोबोटमध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोरोना होण्याचा धोका हा कमी करण्यास मदत होईल.

हे सर्व करणार रोबोट

-इमर्जन्सी चार्जिंग सिस्टीममुळे मोबाईल चार्जिंग

-ऑटोमॅटिक सॅनिटायझर सिस्टीममुळे हात न लावता हात सॅनिटाईज

-३० मिनिटांमध्ये चार्ज होऊन ४५ ते ६० मिनिटे चालू शकतो

-सौर ऊर्जेवर देखील चार्ज

-कोणतेही मोबाईल ॲप न वापरल्याने इंटरनेटची गरज नाही

-कॅमेरामुळे लांबूनसुद्धा रोबोटचे लोकेशन मोबाईलवर कळणार

-१०० मी लांब अंतराहूनदेखील ऑपरेट

डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डीच्या (पुणे) यंत्र अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. व्ही. एस. जत्ती यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय वढाई, संचालक डॉ. नीरज व्यवहारे, प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस पाटील, संकुलाचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी हा रोबोट तयार केला आहे. रोबोटच्या पेटंट फाईलसाठी देखील अर्ज केला आहे.

Web Title: The robot that does not give access without sanitation came to shape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.