कासोदा : ‘देवाच्या घरी जाऊ नये म्हणून देवाचीच मदत’ या मथळ्याखाली एरंडोल-कासोदा रस्त्यावरच्या खड्ड्याची बातमी दि. १३ रोजी प्रसिद्ध होताच सकाळी १० वाजल्यापासूनच या जीवघेण्या खड्ड्याची तातडीने दुरुस्ती सुरू झाली आहे. खड्डा दुरुस्त झाला, मरणाची भीती संपली आणि शेंदूर फासलेला दगडदेखील बाजूला करण्यात आला आहे.
गेल्या ११ तारखेपासून या जीवघेण्या खड्ड्यात पडण्यापासून हा शेंदूर लावलेला दगड येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना वाचवीत होता. पण दि. १३ रोजी ‘लोकमत’मधून वृत्त प्रसिद्ध होताच लागलीच हा खड्डा बुजविला गेला आणि हा दगडदेखील दिसेनासा झाला आहे.
या रस्त्याचे ठेकेदार मे. सचो सतराम इंफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि, चाळीसगाव यांनी तातडीने ही दुरुस्ती केल्याने संभाव्य धोका सध्या तरी टळला आहे. एरंडोल ते कासोदा या राज्य मार्गावरील बांभोरी खुर्दच्या नाल्यावरील हा पूल नव्याने त्वरित व्हावा, फक्त डागडुजी नको,कारण हा हल्लीचा पूल अत्यंत जुना व कमकुवत आहे. पुन्हा नव्याने कधीही खड्डा पडू शकतो. एरंडोल ते जामदा गावापर्यंत हा राज्य मार्ग रुंदीकरणासह नव्याने करण्यात आला आहे. पण, हा ५० वर्षांपेक्षा जास्त जुना व अत्यंत जीर्ण असा हा पुला नव्याने का करण्यात आला नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाच्या पद्धतीबद्दल प्रवाशी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. तातडीने या पुलाचे नूतनीकरण व्हावे, अशी मागणी येथे होत आहे.
130921\img_20210913_115935.jpg
कासोदा-ठेकेदाराकडून खड्डा दूरुस्ती होतांना