बोदवड : येथील प्रभाग क्रमांक ५ मधील शंकर हिवराळे यांच्या घरापासून ते मलकापूर रस्त्याला जोडणारा रस्ता गत वर्षी नऊ लाख रुपये खर्चून तयार केला; मात्र नऊ दिवसांतच या रस्त्याची ‘वाट’ लागली आहे.
हा रस्ता जलचक्रच्या अतुल पाटील या ठेकेदाराने केला. १० दिवसांपूर्वी या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले, परंतु या रस्त्याचे काम होऊन आठ-नऊ दिवस उलटत नाहीत तोच हा दोनशे मीटरचा रस्ता खड्डेमय झाला असून, या खड्ड्यांमध्ये नागरिकांच्या घरासमोर पावसाचे पाणी साचले आहे.
याबाबत रहिवाशांनी संताप व्यक्त केला असून, नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांकडे या रस्त्याच्या दुर्दशेचे चित्रण करून पाठविले आहे.
हा नवीन रस्ता लगेचच खराब झाला असून, पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. तरी या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करून देण्यात यावे.
- संगीता महोरे, रहिवासी
कोणताही भराव न टाकता निव्वळ कच व अत्यल्प डांबर टाकून मोकळे झालेले आहे, त्यामुळे पूर्ण डांबरीकरण निघून रस्ता खड्डेमय झालेला आहे.
- शंकर हिवराळे, रहिवासी
सदर ठेकेदारास त्या रस्त्याचे देयक देण्यात आलेले नाही. खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करून घेण्यात येईल.
- रितेश बच्छाव, नगर पंचायतचे बांधकाम अभियंता