जळगावात लाॅकडाऊन काळात चाॅईस नंबरमुळे तीन कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:16 AM2021-05-09T04:16:26+5:302021-05-09T04:16:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लाॅकडाऊनचा सर्वच क्षेत्रात परिणाम जाणवत असून उद्योग, व्यवसाय बंद झालेले आहेत. त्यामुळे सर्वत्र मंदीची ...

Revenue of Rs 3 crore due to choice number during lockdown in Jalgaon | जळगावात लाॅकडाऊन काळात चाॅईस नंबरमुळे तीन कोटींचा महसूल

जळगावात लाॅकडाऊन काळात चाॅईस नंबरमुळे तीन कोटींचा महसूल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : लाॅकडाऊनचा सर्वच क्षेत्रात परिणाम जाणवत असून उद्योग, व्यवसाय बंद झालेले आहेत. त्यामुळे सर्वत्र मंदीची स्थिती आहे, असे असतानाही आरटीओ विभागाला मात्र सुगीचे दिवस आहेत. एकूण महसुलात घट झाली असली तरी एकट्या चाॅईस नंबरने तीन कोटी रुपयांचा भरणा तिजोरीत जमा झालेला आहे.

हौस व छंद पूर्ण करायचा असेल तर अनेक जण त्यासाठी हवे ते करायला तयार होतात किंवा हवी ती किंमत मोजतात. असाच प्रकार वाहनांच्या क्रमांकाबाबत घडला आहे. आपल्या वाहनावर पसंतीचा क्रमांक असावा, यासाठी सामान्यांसह लोकप्रतिनिधी, उद्योजक व सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाखो रुपये भरून पसंती क्रमांक (चॉईस नंबर) घेतला आहे. एकट्या पसंती क्रमांकाने आरटीओच्या तिजोरीत एका वर्षात तब्बल २ कोटी ९६ लाख रुपयांचा महसूल संकलित झाला आहे.

दरम्यान, जो क्रमांक पसंतीच्या यादीत नाही; परंतु विशिष्टच क्रमांकासाठी २ हजार ५९३ लोकांनी हट्ट धरला व त्यासाठी तब्बल १ कोटी ३ लाख ९३ हजार रुपये तिजोरीत जमा झाले आहे. बहुतांश जणांनी स्वत:चा वाढदिवस, कुटुंबातील मुलगा, मुलगी पत्नी किंवा आई, वडील यांचा जन्मदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस असेल तर तो क्रमांक वाहनासाठी नंबर घेतला आहे. आमदार, खासदार, उद्योजक, सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषदेचे सदस्य यांना देखील हा मोह आवरता आलेला नाही.

दोन वर्षांपूर्वी ०००१ या क्रमांकासाठी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भवरलाल जैन यांनी तब्बल ९ लाख रुपये भरले होते. नियमित कारच्या सिरीजमध्ये हा क्रमांक शिल्लक नव्हता, त्यामुळे दुचाकीच्या सिरीजमधून हा क्रमांक त्यांनी घेतला, त्यासाठी तीन पट रक्कम भरली. २६ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांना हा क्रमांक वितरित करण्यात आला आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनीही १०१ या क्रमांकासाठी लाखाच्या घरात रक्कम भरली होती.

नियमित ०००१ या क्रमांकासाठी ३ लाख रुपये शुल्क आहे. या क्रमांकासाठी अनेकांनी तीन लाख रुपये भरले आहेत. त्यात लोकप्रतिनिधींची संख्या जास्त आहे.

लॉकडाऊनमध्ये घट, दोन महिन्यांत वाढ

लॉकडाऊनमधील एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत १९ लाख ६७ हजार रुपये पसंती क्रमांकातून मिळाले आहेत. याच चार महिन्यांत गेल्या वर्षी ६५ लाख ५० हजार रुपये आरटीओ विभागाला मिळाले होते. चालू ऑगस्ट ते सप्टेंबर या दीड महिन्यात तब्बल ३७ लाख ८ हजार ५०० रुपये तिजोरीत जमा झालेले आहेत. दोन महिन्यांत उत्पन्नात वाढ झाली. गेल्या वर्षी १५ टक्के वाहन नोंदणी कमी असतानाही भरमसाठ उत्पन्न मिळाले होते.

कोट...

लॉकडाऊनमध्ये एकूण महसुली उत्पन्नात घट झाली आहे. अशाही परिस्थितीत पसंती क्रमांकातून एका वर्षात २ कोटी ९६ लाख रुपये मिळाले आहेत. पसंती क्रमांकासाठी शासनाने दर निश्चित केलेले आहेत. साधारण क्रमांकासाठी ५ हजार तर व्हीआयपी क्रमांकासाठी १ ते ३ लाखांपर्यंत दर आहेत. एका वाहनाच्या सिरीजमध्ये क्रमांक शिल्लक नसला तरी दुसऱ्या वाहनातून घेता येतो.

- श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Revenue of Rs 3 crore due to choice number during lockdown in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.