उद्योगांवर पुन्हा निर्बंध; पुन्हा बसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:34+5:302021-07-02T04:12:34+5:30
आकाश नेवे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात चटई उद्योग मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. निर्यातक्षम चटई आणि देशांतर्गत ...

उद्योगांवर पुन्हा निर्बंध; पुन्हा बसला फटका
आकाश नेवे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात चटई उद्योग मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. निर्यातक्षम चटई आणि देशांतर्गत विकल्या जाणाऱ्या चटई उद्योगामुळे जळगावला वेगळी ओळख मिळाली आहे; मात्र गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या लॉकडाऊन आणि निर्बंधामुळे चटई उद्योगाला फटका बसला आहे. सध्या चटई उद्योग क्षमतेच्या फक्त ५५ टक्के उत्पादन करत आहेत.
निर्यातक्षम उद्योगांची संख्या ही १० ते १२ आहे. शहरात तयार होणारी चटई ही युरोप तसेच आखाती देशातदेखील पाठवली जाते. या निर्यात करणाऱ्या उद्योगांना कसलेही निर्बंध नाहीत; मात्र देशात किंवा स्थानिक पातळीवर माल विकणाऱ्या उद्योगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही उद्योगांमध्ये कामगारांची संख्या ५० टक्केपेक्षा जास्त झाली आहे; मात्र त्याचसोबत काही ठिकाणी कामगारांची आवश्यकता असल्याने एका उद्योगात अतिरिक्त झालेले कामगार दुसऱ्या उद्योगात सामावले गेलेत.
काय आहेत अडचणी
एप्रिल महिन्यात लॉकडाऊन लागल्यानंतर जिल्ह्यातील परप्रांतीय कामगार गावी गेले, त्यातील बहुसंख्य कामगार अजूनही परतलेले नाहीत. तर सध्या फक्त ५० टक्के कामगार क्षमतेचे निर्बंध आहेत. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. औद्योगिक वसाहतीत असलेल्या चटई उद्योगांमध्ये जवळपास ५० टक्के कामगार हे परप्रांतीय आहेत. त्यातील बहुसंख्य कामगार कामावर नाहीत. त्यांची जागा ही स्थानिक कामगारांनी घेतली आहे. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारावर फारसा परिणाम झालेला नाही, ही बाब दिलासादायक आहे; मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
शहरातील चटई उद्योग १५०
देशांत चटई विकणारे १४०
परदेशात चटई निर्यात करणारे १०
अवलंबून कामगारांची संख्या ५०००
कोट - चटई उद्योग सध्या जवळपास ४५ टक्केंनी मंदावला आहे. उत्पादन आणि विक्रीच्या प्रक्रियेवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे; मात्र सध्या परप्रांतीय कामगार परत गेल्याने स्थानिकांच्या रोजगारावर फारसा परिणाम झालेला नाही. - महेंद्र रायसोनी, अध्यक्ष जळगाव मॅट मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन
कोट - एप्रिल महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्याने कामगार गावी गेले होते. ते अजूनही परतलेले नाही. आता जुलैमध्ये मार्केट पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणे चांगले नाही. - जयदीप रडे, सचिव जळगाव मॅट मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन.