अर्थ मंत्रालयातील काम जबाबदारीचे आणि आव्हानात्मक-सुनील चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 00:08 IST2020-06-28T00:07:05+5:302020-06-28T00:08:31+5:30
शरदकुमार बन्सी धरणगाव , जि.जळगाव : अर्थ मंत्रालयातील आर्थिक कार्य विभाग भारत सरकारची आर्थिक धोरणे ठरविणारा असा महत्त्वाचा विभाग ...

अर्थ मंत्रालयातील काम जबाबदारीचे आणि आव्हानात्मक-सुनील चौधरी
शरदकुमार बन्सी
धरणगाव, जि.जळगाव : अर्थ मंत्रालयातील आर्थिक कार्य विभाग भारत सरकारची आर्थिक धोरणे ठरविणारा असा महत्त्वाचा विभाग आहे. यात माझ्याकडे आपल्या देशाचे ‘राजकोशीय धोरण’ तयार करणे व त्याची अंमलबजावणी करण्यासंबंधी कार्य आहे. सोप्या भाषेत, भारत सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करणाऱ्या मुख्य टीमचा मी एक घटक आहे. कार्य राष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. यामुळे मोठ्या जबाबदारीचे आणि आव्हानात्मक तर आहेच, पण त्यासोबत समाधान देणारेही असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयातील उपसचिव सुनील भागवत चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
त्यांची १ जून रोजी आर्थिक कार्य विभागात उपसचिव म्हणून निवड झाली. झुरखेडा, ता.धरणगाव येथील ते मूळ रहिवासी आहेत. यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न : या पदावर निवड कशी झाली?
पदवी मिळवल्यानंतर पुण्यात खासगी कंपनीत दोन वर्ष काम केले. पुढे भारतीय स्टेट बँकेत पुणे, औरंगाबाद, मुंबई येथे चार वर्षे प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नोकरी केली. २००८ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालो. केंद्र सरकारमध्ये इंडियन सिव्हिल अकौंटस सर्व्हिस (आय.सी.ए.एस.) या वित्तीय प्रबंधन संबंधित कार्य करणाºया सेवेत निवड झाली. यामुळे सुरुवातीपासून नवी दिल्ली येथे नियुक्ती आहे.
प्रश्न : आतापर्यंत कोणत्या जबाबदाºया पार पाडल्या?
आतापर्यंत केंद्र सरकारच्या शहर विकास मंत्रालय, अर्थ मंत्रालय, रसायन आणि खते मंत्रालय या ठिकाणी वेगवेगळ्या जबाबदाºया हाताळल्या आहेत.
प्रश्न : यू.पी.एस.सी. परिस्थिती उत्तीर्ण होण्यासाठी काय प्रयत्न केले?
ठरवलेल्या ध्येयापासून विचलीत न होता, अभ्यासात सातत्य ठेवले. स्टेट बँकेत नोकरी करीत असतानाच यू.पी.एस.सी.चा अभ्यास सुरू केला. यशस्वी झालेल्या तरुणांच्या अनुभव कथनातून शिकत गेलो आणि स्वत:ला मोटिव्हेट करत गेलो.
प्रश्न : तुमचा आदर्श कोण आहे?
प्रामाणिक तथा जबाबदारीने आपली कर्तव्ये करणारी प्रत्येक व्यक्ती मग ती कोणत्याही क्षेत्रातील आणि कोणत्याही स्तरावरील असो, ती माझ्यासाठी आदर्शवत आहे.
प्रश्न : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया तरुणाईला काय सांगणार?
केवळ स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे नव्हे तर सर्वच तरुणांना सांगायला मला आवडेल की, आजचे जग हे स्पर्धात्मक आणि धावपळीचे आहे. त्यामुळे क्षेत्र कोणतेही असो, स्पर्धा ही अटळ आहे. स्पर्धा इतरांशी कमी आणि स्वत:शी जास्त करा. यातून जादा तणाव येणार नाही आणि स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवून ध्येयापर्यंत जलद पोहोचता येईल. दुसरे असे की, सेल्फ मोटिव्हेशन आवश्यक आहे. त्यासाठी मनाने, विचारांनी व शरीराने सुदृढ राहा. सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता तुमच्या व्यक्तिमत्वात भिनू द्या. शेवटचे आणि अति महत्त्वाचे मेहनतीला पर्याय नाही. म्हणून या सर्व गोष्टी सोबत घेऊन, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सातत्याने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत राहा, यश नक्की मिळेल.
प्रश्न : ग्रामीण भागातून आलेला अधिकारी म्हणून अर्थ मंत्रालयात काम करतानाचा आपला अनुभव?
ग्रामीण पार्श्वभूमी ही माझ्यासाठी नेहमीच जमेची बाजू राहिली आहे. ग्रामीण भागात अजूनही सोयी-सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे आपल्या ध्येय मार्गावर चालत असताना येणाºया अडचणी आणि आव्हानांवर मात करीत पुढे वाटचाल करण्याची सवय होऊन जाते. यातून आत्मविश्वासही उंचावतो. भारत सरकारच्या आर्थिक आणि इतर धोरणांचा ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून अधिक चांगला विचार करता येतो. त्यामुळे अर्थ मंत्रालयात काम करताना नक्कीच छान वाटते.
प्रश्न : आपली कौटुंबिक पार्श्वभूमी
जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात. आई-वडिलांचे शालेय शिक्षण झालेले नसले तरी त्यांच्याकडे इतर अनुभवांचे शिक्षण मोठे होते. शिक्षणाचे महत्व त्यांना चांगले माहीत होते, म्हणून त्यांनी आम्हा भावंडांना शिक्षणासाठी प्रेरणा दिली. मोठे भाऊ प्राथमिक शिक्षक, तर लहान भाऊ शेती करतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असताना त्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. पत्नी रुपालीचे नेहमीच सहकार्य असते.