हिवाळी सुट्ट्यांचे रिशेड्युलिंग होईना, प्राध्यापक संघटना संतप्त!
By अमित महाबळ | Updated: November 1, 2023 18:53 IST2023-11-01T18:52:56+5:302023-11-01T18:53:09+5:30
विद्यापीठ आणि प्राध्यापक संघटना यांच्यातील रिशेड्युलिंगचा वाद आणखीन वाढण्याची चिन्हे आहेत.

हिवाळी सुट्ट्यांचे रिशेड्युलिंग होईना, प्राध्यापक संघटना संतप्त!
जळगाव : विद्यापीठाने एन. मुक्ता संघटनेला पत्र देऊन सुट्ट्यांच्या रिशेड्युलिंगसंदर्भात चर्चेला बोलविले होते, परंतु बैठकीच्या सुरुवातीलाच प्र कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे यांनी दिवाळी सुट्यांचे रिशेड्युलिंग न करण्यावर विद्यापीठ ठाम असल्याचे सांगितले. यामुळे विद्यापीठ आणि प्राध्यापक संघटना यांच्यातील रिशेड्युलिंगचा वाद आणखीन वाढण्याची चिन्हे आहेत.
एन. मुक्ता संघटना दिवाळीच्या अनुषंगाने सुट्यांचे रिशेड्युलिंग करून मिळावे या मागणीसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे पाठपुरावा करत आहे. या संदर्भात प्रशासनाने मंगळवारी, चर्चेसाठी संघटनेला बोलावले होते. यावेळी रिशेड्युलिंगसह डिसेंबरमधील हिवाळी सुट्ट्यांमध्ये परीक्षेचे कामकाज प्राध्यापकांना बंधनकारक न करता ऐच्छिक करावे, त्याचे पत्र विद्यापीठाने निर्गमित करावे, अशी भूमिका एन. मुक्ताच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने विचार करून कळवू, असे सांगितले. तसेच सुट्यांचे रिशेड्युलिंग न करण्यावर विद्यापीठ ठाम असल्याचे सांगण्यात आले. परीक्षा नियंत्रक डॉ. योगेश पाटील, उपकुलसचिव डॉ. जी. एन. पवार, एन-मुक्ता संघटनेचे अध्यक्ष डॉ. नितीन बारी, सिनेट सदस्य डॉ. अजय पाटील, डॉ. कांचन महाजन, प्रा. डॉ . मनोज चोपडा, सचिव डॉ. पवन पाटील बैठकीतील चर्चेत सहभागी झाले होते.
परीक्षा पुढे ढकलतात, मग रिशेड्युलिंग का नाही ?
बी.कॉम.च्या परीक्षा विद्यापीठाने अडचण येताच बरोबर १५ दिवस पुढे ढकललेल्या आहेत, तसेच ग्रामपंचायत निवडणुकीमुळे जनरल नॉलेज व एन्व्हायरमेंटचा पेपरही पुढे ढकलला आहे. या सगळ्या परीक्षा विद्यापीठ पुढे ढकलू शकते. परंतु, सुट्ट्यांचे रिशेड्युलिंग करण्याची मागणी फक्त एन. मुक्ताने केल्यामुळेच सुट्या द्यायला विद्यापीठ टाळाटाळ करत आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात हिवाळी परीक्षा २०२३ च्या नियोजित तारखेत बदल करून ही परीक्षा दिवाळी सुट्टीनंतर घेण्यात यावी अशी मागणी स्वामुक्टा संघटनेच्यावतीने करण्यात आली होती. त्यांची मागणी झाली तर मग आपल्या विद्यापीठाला काय अडचण आहे, असा प्रश्नही डॉ. नितीन बारी यांनी उपस्थित केला आहे.