टपावरून पाणी गळणाऱ्या १० बसची केली दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:21 IST2021-08-25T04:21:40+5:302021-08-25T04:21:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पावसाळा सुरू झाल्यानंतर बसच्या टपावरून पाणी गळती होत असलेल्या १० बस आढळून आल्यानंतर, जळगाव ...

Repair of 10 buses leaking water from Tapa | टपावरून पाणी गळणाऱ्या १० बसची केली दुरुस्ती

टपावरून पाणी गळणाऱ्या १० बसची केली दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पावसाळा सुरू झाल्यानंतर बसच्या टपावरून पाणी गळती होत असलेल्या १० बस आढळून आल्यानंतर, जळगाव आगारातर्फे या सर्व बस दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच ज्या बसमध्ये फाटलेली व वाकलेली आसने आढळून येत आहेत, त्या बसची देखील तत्काळ दुरुस्ती करण्यात येत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

महामंडळातर्फे दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी बसच्या टपांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येते. त्यानुसार जळगाव विभागातर्फेही पावसाळ्यापूर्वी प्रत्येक बसच्या टपाची पाहणी करण्यात येऊन ज्या - ज्या ठिकाणी कुजलेला पत्रा आढळून आला, त्या ठिकाणी नवीन लोखंडी पत्रा जोडून, दुरुस्ती करण्यात आली. मात्र, पावसाळा सुरू झाल्यानंतरही काही बसच्या टपावरून पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जळगाव आगारातर्फे या सर्व बसची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच चालक-वाहकांना ज्या पावसाळ्यात ज्या बसच्या टपावरून पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आले असेल, त्या बसची माहिती तत्काळ आगार प्रशासनाला देण्याच्या सूचना केल्या आहेत. ज्यामुळे संबंधित बसच्या छताची तत्काळ दुरुस्ती होऊन, प्रवाशांची गैरसोय टळत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

पावसाळ्यापूर्वी बसच्या टपांची दुरुस्ती करण्यात येत असते. नुकत्याच १० बसच्या टपांची दुरुस्ती करण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी महामंडळातर्फे तत्काळ या बसची दुरुस्ती केली जाते. तसेच बसमध्ये कुठे आसने फाटलेली असतील, तर त्यांची तत्काळ दुरुस्ती केली जाते.

नीलेश पाटील, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार

इन्फो :

गाड्यांचा मेंटेनन्स वाढला, पण पैसा नाही :

- गेल्या काही वर्षांत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे महामंडळाच्या अनेक बसचे स्पेअर पार्ट व बॉडीचे नुकसान झाले. यावर दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च आला असल्याचे सांगण्यात आले.

- विशेषत: जळगाव ते औरंगाबाद या रस्त्यावर बसच्या टायरांचा मोठा घसारा झाला. दर आठवड्याला अनेक गाड्यांचे टायर पंक्चर व्हायचे. त्यामुळे टायरावर मोठ्या प्रमाणावर खर्च झाला असल्याचे सांगण्यात आले.

- कोरोनामुळे आधीच महामंडळाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यात उत्पन्नापेक्षा बसच्या मेंटेनन्सवर जास्त पैसा खर्च होत आहेत. त्यामुळे तोट्यात असलेले महामंडळ अधिकच तोट्यात जात आहे.

इन्फो :

तुटलेल्या आसनांमुळे बसचा प्रवास कसरतीचा

आता पावसाळ्यात बसमध्ये टपावरून पाणी गळताना कुठे दिसून आले नाही. मात्र, अनेक बसमध्ये शेवटच्या रांगेतील आसने तुटलेली आढळून येत असल्यामुळे व्यवस्थित बसता येत नाही. त्यात खड्ड्यांमुळे खाली-वर होत असल्यामुळे, शेवटच्या आसनांवर बसून प्रवास खूपच कसरतीचा होतो.

- पंकज पाटील, प्रवासी

पूर्वी गळक्या बस खूप दिसायच्या. मात्र, आता हे प्रमाण कमी दिसते. आसनेही चांगली असतात. मात्र, बसमधील पिंचकाऱ्यांनी रंगलेल्या खिडक्यांमुळे बसचा प्रवास करायला आवडत नाही. खिडक्यांजवळ बसू वाटत नाही. महामंडळाने स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

- सुरेश शिंदे, प्रवासी

Web Title: Repair of 10 buses leaking water from Tapa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.