महावितरण : भर वस्तीतील विजेच्या खांबावर वीज प्रवाह उतरल्याने नागरिकांचा संताप
जळगाव : शनिपेठेतील गवळी वाड्याजवळील श्रीकृष्ण मंदिराजवळ एका विजेच्या खांबावर वीज प्रवाह उतरल्यामुळे, रेड्याला विजेचा धक्का लागून हा रेडा दगावल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. विशेष म्हणजे भर वस्तीतील या विजेच्या खांबावर वीज प्रवाह उतरल्यामुळे, येथील नागरिकांकडून महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गवळी वाड्यातील रहिवासी राकेश गवळी हे नेहमीप्रमाणे आपल्या म्हशी सकाळच्या सुमारास प्रजापत नगर परिसरात चरण्यासाठी सोडत असतात. त्यानुसार सोमवारी राकेश गवळी यांनी आपल्या म्हशी चरण्यासाठी सोडल्या. या म्हशींसोबत चरण्यासाठी रेड्यालादेखील सोडण्यात आले होते. नेहमी प्रमाणे राकेश गवळी यांच्याकडील कामाला असलेली व्यक्ती या म्हशी श्रीकृष्ण मंदिरमार्गे नेत असताना, रस्त्याला लागून असलेल्या एका विद्युत खांबावर वीज प्रवाह उतरलेला होता. विशेष म्हणजे या खांबाच्या आजूबाजूच्या भागातही पाण्यामुळे वीजपुरवठा उतरल्यामुळे, रस्त्यावरून जाणाऱ्या या रेड्याला विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज प्रवाह बंद करून तेथील बिघाड शोधला. तसेच या दुर्घटनेच्या पंचनाम्याबाबत पोलिसांना माहिती दिली.
इन्फो :
...तर मोठी दुर्घटना उद्भवली असती :
विजेच्या धक्क्याने रेडा दगावल्याच्या घटनेनंतर येथील नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या परिसरात नागरी वस्ती असल्यामुळे सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत नागरिकांची वर्दळ सुरू असते. रस्त्यावरून नेहमी नागरिक ये-जा करीत असतात. लहान मुले खेळत असतात. अशा परिस्थितीत एखाद्याला विजेचा धक्का लागला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे महावितरण प्रशासनाने पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांमधून केली जात आहे.
इन्फो :
केबलमधून तार निघाल्यामुळे खांबामध्ये उतरला प्रवाह :
या घटने प्रकरणी या भागातील महावितरणचे प्रभारी सहायक अभियंता रमाकांत पाटील यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी महावितरणने या परिसरात एरियल बंच केबल बसविली आहे. या केबलवरील कोटिंग निघाल्यामुळे तारेचा काही भाग बाहेर येऊन, त्याचा स्पर्श विद्युत खांबाला झाल्याने या खांबात वीज प्रवाह उतरला असे त्यांनी सांगितले. तसेच पोलिसांना घटनेची माहिती दिली असून, पोलिसांनी पंचनाम्याचा अहवाल पाठविल्यावर संबंधिताला रेड्याची आर्थिक भरपाई महावितरणकडून देण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.