दुर्मीळ रानकुत्र्यांची २० वर्षांनंतर नोंद; सातपुडा पर्वतरांगा आश्रयस्थान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 08:31 IST2021-05-20T08:30:46+5:302021-05-20T08:31:24+5:30

जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा अनेक दुर्मीळ व संकटग्रस्त प्रजातींसाठी महत्त्वाचे आश्रयस्थान आहे.

Record of rare wild dogs after 20 years; Satpuda Range Shelter | दुर्मीळ रानकुत्र्यांची २० वर्षांनंतर नोंद; सातपुडा पर्वतरांगा आश्रयस्थान 

दुर्मीळ रानकुत्र्यांची २० वर्षांनंतर नोंद; सातपुडा पर्वतरांगा आश्रयस्थान 

जळगाव : जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा दुर्मीळ पक्षी, वनस्पती, प्राणी यांच्या अस्तित्वासाठी वरदान ठरत आहेत. अशाच महत्त्वपूर्ण रानकुत्रे म्हणजेच भारतीय ढोल या संकटग्रस्त सस्तन प्रजातीची वन्यजीव संरक्षण संस्थेच्या राहुल व प्रसाद सोनवणे या वनस्पती व पक्षी अभ्यासकांना तब्बल २० वर्षांनंतर नोंद घेण्यात यश आले आहे. 

जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा अनेक दुर्मीळ व संकटग्रस्त प्रजातींसाठी महत्त्वाचे आश्रयस्थान आहे. जिल्ह्यात वाघ, बिबट, रानगवे, अस्वल, पाणमांजर, खवलेमांजर, तडस, कोल्हे, लांडगे अशा सर्वच महत्त्वपूर्ण प्रजातींचे अस्तित्व आहे. नावीन्यपूर्ण दुर्मीळ वनस्पती, पक्षी, प्राणी प्रजाती या भागातून नोंदविल्या जात आहेत.

रानकुत्र्यांची भारतीय वनांतील संख्या २५०० पर्यंत आहे. नुकत्याच प्रसिद्ध होणाऱ्या रेड डाटा बुक मध्ये रानकुत्र्यांच्या सद्य:स्थितीची नोंद म्हणजे धोकाग्रस्त म्हणून केलेली आढळते. त्यामुळे धोकाग्रस्त असलेल्या भारतीय वाघांप्रमाणेच रानकुत्र्यांच्याही संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत वनस्पती व पक्षी अभ्यासक प्रसाद सोनवणे यांनी व्यक्त केले आहे.

रानकुत्र्यांची वैशिष्ट्ये 
रानकुत्रे हे जंगली कुत्रे, ढोल, कोलसारा, कोलसा अशा नावांनी ओळखले जातात. रानकुत्रे समूहात राहणारे प्राणी असून, पाळीव कुत्र्यांपेक्षा आकाराने मोठे असतात. लांडग्यांप्रमाणेच त्यांचे माेठमाेठे कळप असतात. हरीण, काळवीट, नीलगाय, ससे हे त्यांचे नेहमीचे खाद्य आहे. भुकेलेल्या जंगली कुत्र्यांनी माेठी रानडुकरे, गवे, बिबट व वाघांवरही हल्ला करून ठार केल्याची उदाहरणे आहेत.

वाघ, रानगवे, रानकुत्रे यांसारख्या प्राण्यांना अशाच विस्तृत जंगलाची आवश्यकता असते. या प्राण्यांचे जिल्ह्यात आढळणे हे जिल्ह्यातील वनांची गुणवत्ता व वढाेदा-अनेर व्याघ्रसंचारमार्गाचे अनन्यसाधारण महत्त्व विषद करणारे आहे. - राहुल सोनवणे, वनस्पती व पक्षी अभ्यासक, (वन्यजीव संरक्षण संस्था)

Web Title: Record of rare wild dogs after 20 years; Satpuda Range Shelter