राष्ट्रीय अंध विद्यालयाची मान्यता रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST2021-06-11T04:12:22+5:302021-06-11T04:12:22+5:30
संजय सोनार चाळीसगाव : अनेक पुरस्कारप्राप्त व गौरवशाली परंपरा लाभलेल्या चाळीसगावच्या राष्ट्रीय अंध विद्यालयाची काही तांत्रिक कारणास्तव मान्यता रद्द ...

राष्ट्रीय अंध विद्यालयाची मान्यता रद्द
संजय सोनार
चाळीसगाव : अनेक पुरस्कारप्राप्त व गौरवशाली परंपरा लाभलेल्या चाळीसगावच्या राष्ट्रीय अंध विद्यालयाची काही तांत्रिक कारणास्तव मान्यता रद्द करण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून या शाळेतील शिक्षकांचे पगार रखडले आहेत. कोरोनासारख्या विदारक परिस्थितीत ही या शाळेची मान्यता रद्द करण्यात आल्याने तालुक्यातून संताप व्यक्त होत आहे.
या अंधशाळेत एकूण साठ विद्यार्थी शिकत असून मुख्याध्यापकसह दहा शिक्षक व इतर आठ कर्मचारी असे एकूण अठरा कर्मचारी आठ महिन्यांपासून पगाराविना आहेत. सध्या कोरोनाच्या संकटकाळात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न या शिक्षकांना पडला आहे. जन्मतःच आलेले अंधत्व, घरातील हलाखीच्या परिस्थितीवर मात करून या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत त्यांच्या निवास व जेवणाची व्यवस्थाही आहे. शाळेची मान्यता रद्द झाल्याने अनुदानाअभावी या विद्यार्थ्यांचेही भविष्य धोक्यात आले आहे.
या अंधशाळेची मान्यता दर पाच वर्षांनंतर मिळत असते. त्यासाठी दर पाच वर्षांनंतर मान्यतेसाठी शाळेला नवीन प्रस्ताव दाखल करावा लागतो. सन २०१४ मध्ये शाळेला मिळालेली मान्यता मार्च २०१९ मध्ये संपली. त्यामुळे एप्रिल २०१९ रोजी शाळेच्या मान्यतेसाठी नवीन प्रस्ताव शाळेने दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्याकडे सादर केला होता. या वेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जळगाव यांनी या अंधशाळेच्या कार्याबद्दल ए ग्रेडची शिफारस वरिष्ठांकडे केली होती. काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करून या विभागाने एप्रिल ते सप्टेंबर २०१९ पर्यंत केवळ सहा महिन्यांसाठी शाळेला मान्यतेचे पत्र दिले.
कोट
अंधशाळेच्या मान्यता रद्द करण्याच्या आयुक्त यांच्या निर्णयाविरुद्ध मंत्रालयात दाद मागितली आहे. कोरोनासारख्या परिस्थितीत शिक्षकांची उपासमार थांबविण्यासाठी नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी पुढे येऊन शाळेला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा आहे.
- प्रभा महादेव मिश्राम, मुख्याध्यापिका, राष्ट्रीय अंध विद्यालय, चाळीसगाव