कोव्हॅक्सिनचे ३६०० डोस प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST2021-04-06T04:16:15+5:302021-04-06T04:16:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरणात लसींचे डोस मर्यादित येत असल्याने अनेक केंद्रांवर बंधने येत आहेत. यात ...

कोव्हॅक्सिनचे ३६०० डोस प्राप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरणात लसींचे डोस मर्यादित येत असल्याने अनेक केंद्रांवर बंधने येत आहेत. यात आता कोव्हॅक्सिन लसीचे ३६०० डोस प्राप्त झाले असून येत्या दोन दिवसांत कोविशिल्ड लसीचेही वाढीव डोस येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली.
कोविशिल्ड लसीचे काही दिवसांपूर्वी २७ हजार डोस आले होते. दरम्यान, आता केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. हा टप्पा साधारण महिनाभरात पूर्ण करायचा असून त्यानंतर महिनाभराने २५ वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांवरही लसीकरण सुरू आहे. यासह अन्य ३३ केंद्रे असून यात प्रत्येक केंद्रावर कमी-अधिक प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
शहरातील काही केंद्रांवर मर्यादा
शहरातील काही केंद्रांवर गर्दी होत असून काही केंद्रांवर मात्र लसीकरणाला मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. यात काही केंद्रांवर कोव्हॅक्सिनचा डोस देण्यात येत असल्याने व हे डोस संपल्यामुळेही ही बंधने आली होती. आता कोव्हॅक्सिनचे ३६०० डोस प्राप्त झाले आहेत.