दिलासादायक..... कुष्ठरोगाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस होतेय घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 13:18 IST2020-01-30T13:18:07+5:302020-01-30T13:18:40+5:30
तीन वर्षात २७७ने घटली संख्या : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचे यश

दिलासादायक..... कुष्ठरोगाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस होतेय घट
जळगाव : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमुळे जिल्ह्यात कुष्ठरोग्यांच्या संख्येत दिवसेदिवस घट होत असून गेल्या तीन वर्षात रुग्णांची संख्या २७७ ने घटली आहे. या सोबतच दरवर्षी हजारो रुग्ण रोगमुक्क होत आहेत.
कुष्ठरोगाचा नायनाट करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने ‘कुष्ठरोगाविरुद्ध अखेरचे युद्ध’ सुरू असून यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम पंतप्रधान प्रगती योजनेंतर्गत राबविण्यात येत आहे. याअंतर्गत कुष्ठरोग शोध मोहीम व स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
याद्वारे होणाऱ्या शोधमोहिमेमुळे रुग्णांची तत्काळ माहिती मिळून वेळीच उपचार करणे शक्य होत आहे. तसेच जमजागृतीमुळेही आळा बसणे शक्य झाले आहे.
स्पर्श कुष्ठरोग अभियान
१३ सप्टेंबर २०१९ ते २८ सप्टेंबर २०१९ या दरम्यान घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ३६८ नवीन रुग्ण आढळून आले. या सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त स्पर्श कुष्ठरोग अभियान राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात विद्यार्थी प्रभात फेरी, गटचर्चा, महिला मेळावा, बसस्थानक, रेल्वे स्थानक, बाजार अशा ठिकाणी प्रदर्शन लावण्यात येणार आहे.
कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्र
जिल्ह्यातील १४ तालुक्यात रुग्णांंसाठी कुष्ठरोग संदर्भ केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामध्ये रुग्णांना भौतिक उपचार, जखम असलेल्या रुग्णांना सल्ला देण्यासह उपचार केले जातात. सोबत उपयुक्त साहित्याचे वाटप केले जाते.
विकृती रुग्णांना अहमदनगर जिल्ह्यातील वडाळा व अमरावती जिल्ह्यातील कोठारा येथे पाठवून शस्त्रक्रिया करण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना ८ हजार रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे या रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.