रावेरला अखेर कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 23:01 IST2019-12-11T22:59:59+5:302019-12-11T23:01:36+5:30
‘कापूस खरेदी केंद्राकडे ग्रेडरची पाठ’ असे ठळक वृत्त ‘लोकमत’ला झळकताच कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. मात्र, कापसाची प्रत्यक्षात कापूस खरेदी शनिवारपासून सुरू होणार आहे.

रावेरला अखेर कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ
रावेर, जि.जळगाव : ‘कापूस खरेदी केंद्राकडे ग्रेडरची पाठ’ असे ठळक वृत्त ‘लोकमत’ला झळकताच कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. मात्र, कापसाची प्रत्यक्षात कापूस खरेदी शनिवारपासून सुरू होणार आहे.
प्रारंभी, गणेश ट्रेडिंग कंपनी या भोकरी नजीकच्या जिनींग कारखान्यात आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते काटापूजन करून खिरोदा प्र.रावेर येथील शेतकरी रवींद्र महाजन यांचा कापूस खरेदी करण्यात आला. यावेळी माजी आमदार अरूण पाटील, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि.प.चे माजी सभापती सुरेश धनके, सभापती श्रीकांत महाजन, मसाकाचे व्हा.चेअरमन भागवत पाटील, ग्रेडर गणेश कराडे, जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, माजी सभापती डी.सी.पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, गोंडू महाजन, खरेदी विक्री संघाचे चेअरमन पी.आर.पाटील, माजी चेअरमन सूर्यभान चौधरी, महेश चौधरी, आदी उपस्थित होते.
दरम्यान, कृउबा सभापती श्रीकांत महाजन यांनी कायमस्वरूपी ग्रेडर देण्याबाबत व कापसाच्या आर्द्रतासंबंधी अटीशर्ती शिथिल करण्यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
माजी आमदार अरूण पाटील यांनी शासनाने कापूस खरेदी केंद्रास आधीच विलंब केला असल्याने व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता विनाशर्थ व विनाअट शेतकऱ्यांचा कापूस उत्पादन सन्मानाने खरेदी करावा, असे स्पष्ट केले. जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनीही उशिराने होणाºया कापूस खरेदीत शेतकºयांची कोणत्याही कारणास्तव कोंडी होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करून कापूस खरेदी केंद्राच्या खरेदीमुळे स्थानिक बाजारपेठेत बाजारमूल्य वधारण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.
आमदार शिरीष चौधरी यांनी शेतकºयांच्या नगदी पीक असलेल्या कापसाला न्याय देण्यासाठी ग्रेडरची कायम नियुक्ती व कापसाच्या आर्द्रतासंबंधी शासन दरबारी तातडीने पाठपुरावा करणार असल्याचे आश्वस्त केले.
दरम्यान, या उद्घाटनाच्या मुहूर्ताप्रसंगी मोजलेल्या १०० क्विंटलऩंतर कापूस खरेदी थोपवण्यात आली असून, येत्या शनिवारपासून कापूस खरेदी केला जाणार आहे. बोदवड व रावेर कापूस खरेदी केंद्रातील कापूस खरेदीसाठी आठवड्यातील काही दिवस दोन्हीकडे विभागून कामकाज चालवणार असल्याचे ग्रेडर गणेश कराडे यांनी स्पष्ट केले.
सूूत्रसंचालन गोपाळ महाजन यांनी, तर आभार गोंडू महाजन यांनी मानले.