कोरोना परिणाम : प्रवासी संख्या घटल्याने रेल्वेचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मुंबई ते दिल्ली नियमित धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसला कोरोनामुळे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही गाडी आठवड्यातून फक्त दोनच दिवस सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
कोरोनामुळे गेल्या आठवडाभरापासून अनेक गाड्यांची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने काही गाड्या ३० जूनपर्यंत स्थगित केल्या आहेत. यात जळगाव रेल्वे स्टेशनवर थांबा असलेल्या पाच रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.
तसेच आता राजधानी एक्स्प्रेसलाही गेल्या आठवडापासून प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ७ मे पासून ही गाडी आता दर शनिवारी आणि मंगळवारी असे आठवड्यातून दोनच दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तर दिल्लीहून परतीच्या प्रवासासाठी दर बुधवारी आणि रविवारी धावणार आहे.
इन्फो :
३० जूनपर्यंत दोनच दिवस धावणार
रेल्वे प्रशासनाने कोरोनामुळे ही गाडी ३० जूनपर्यंत अशा पद्धतीने आठवड्यातून दोनच दिवस चालविण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यावरच ही गाडी दररोज धावणार आहे. दरम्यान, सध्या या गाडीच्या वेळापत्रकात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.