चाळीसगावात पावसामुळे घर कोसळून कुटुंब उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 15:34 IST2019-10-23T15:33:21+5:302019-10-23T15:34:26+5:30
हातमजुरी करणारे अशोक कांतीलाल चव्हाण यांचे राहते घर २२ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास सतत होत असलेल्या पावसामुळे कोसळले.

चाळीसगावात पावसामुळे घर कोसळून कुटुंब उघड्यावर
संजय सोनार
चाळीसगाव, जि.जळगाव : हातमजुरी करणारे अशोक कांतीलाल चव्हाण यांचे राहते घर २२ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास सतत होत असलेल्या पावसामुळे कोसळले. यात एक लाख रुपयांपर्यंत वित्तहानी झाली आहे. घर पडल्याने या कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे.
मंगळवारी रात्री पाऊस सुरू असल्याने हे कुटुंब घरातच बसून होते. अचानकपणे घराची एक भिंत कोसळताच सर्वजण घाबरून बाहेर पडले आणि काही क्षणातच १२ पत्र्यांचे घर जमीनदोस्त झाले.
अगदी थोडक्यात कुटुंबाला होणारी इजा टळली. आताही हे कुटुंब घराबाहेर बसून शासनाच्या मदतीची वाट पहात आहे.
पत्नी, चार मुले व वडील असा यांचा परिवार आहे. शासनाने त्वरित पंचनामा करून शासकीय मदत देण्यात यावी, अशी अपेक्षा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.