अमळनेर : शहरातून जाणाऱ्या धुळे चोपडा राज्य मार्ग १५ वर वाहतुकीला अडथळा करणाऱ्या २०० वाहन चालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला असून प्रत्येकी २०० प्रमाणे ४० हजार रुपये ऑनलाइन दंड करण्यात आला आहे.
धुळे चोपडा रस्त्यावर आर. के. नगर ते पैलाड नाक्यापर्यंत विविध दुकानांवर, बँकेत, दवाखान्यात येणारे ग्राहक अस्ताव्यस्त बेशिस्तीने वाहने लावून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना वाहतुकीत अडथळे निर्माण करीत असतात. या संदर्भात अनेक दिवसांपासून नागरिकांची ओरड होती. कारण येता-जातांना वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत असे.
ज्या उद्देशाने हायब्रीड अन्यूटी अंतर्गत रस्ता बांधला आहे तो उद्देश सफल होत नसल्याने पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व त्यांचे सहकारी स्वतः रस्त्यावर उतरले त्यांनी मोबाइल हातात घेऊन २०० वाहनांना ऑनलाइन दंड केला. त्यांच्यासोबत हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कोठावदे, हेडकॉन्स्टेबल विलास बागुल, पोलीस नाईक शरद पाटील, दीपक माळी, रवींद्र पाटील यांनी सहकार्य केले. दिवसभर वाहतूक पोलिसांना कारवाईची सक्ती केली आहे. त्यामुळे शहरातील रस्ता मोकळा झाल्याने प्रवाश्यानी समाधान व्यक्त केले आहे.
बसस्थानकासमोर असते गर्दी
बसस्थानकाजवळ अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने, काली पिली, रिक्षा रस्त्यावर उभी करून ग्राहकांना येण्या-जाण्यास जागा ठेवत नाही. तसेच बसस्थानकावरून जेव्हा बस बाहेर पडते त्यावर समोर रिक्षा बेशिस्तपणे उभ्या असतात. यामुळे बऱ्याच वेळेस वादही होतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन या ठिकाणी शिस्त लावणे गरजेचे आहे. तसेच भाजी बाजारात, लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स, निकुंभ हाईट्सजवल,स्टेट बँक, बडोदा बँक, पोस्ट ऑफिस बाहेर,जेडीसीसी बँक, धुळे ग.स. बँक, शिरपूर पीपल्स आदी ठिकाणीदेखील बाहेर रस्त्यावर वाहनांची गर्दी असते. त्यामुळे रस्ता अरुंद होत असतो. या विरुद्ध कठोर कारवाई करावी व वाहनधारकांना शिस्त लावावी, अशी मागणी नागरिकानी केली आहे.
----
रस्त्यात वाहने लावून अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध ऑनलाइन दंडाची कारवाई करताना पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व पोलीस (छाया अंबिका फोटो) १८/२