शिरसोलीत आयुष्यमान भारत रुग्णालयासमोरच पाण्याचे डबके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST2021-09-07T04:21:10+5:302021-09-07T04:21:10+5:30
शिरसोली: शिरसोली प्र.बो. येथे भरवस्तीत रस्ते,गटारी नसल्याने आयुष्यमान भारत रुग्णालया समोरच मोठे पावसाच्या पाण्याचे डबके साचत असल्याने रुग्णांसह येथील ...

शिरसोलीत आयुष्यमान भारत रुग्णालयासमोरच पाण्याचे डबके
शिरसोली: शिरसोली प्र.बो. येथे भरवस्तीत रस्ते,गटारी नसल्याने आयुष्यमान भारत रुग्णालया समोरच मोठे पावसाच्या पाण्याचे डबके साचत असल्याने रुग्णांसह येथील रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पालकमंत्री, आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर बाबींचा विचार करून या परीसरात गटारी व रस्ते बनविण्याची मागणी केली जात आहे.
शिरसोली प्र.बो. येथील बारी नगरला लागून त्र्यंबकनगर (पाण्याचा टाकीचा परिसर) असून या भागात जवळपास पंधरा वर्षांपासून रहिवासी प्लॉट पडलेले असून याच भागात
बऱ्यापैकी रहिवासी वस्ती आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी याच विभागात आरोग्यविभागाचे आयुष्यमान भारत रुग्णालय आहे. या रुग्णालयात नागरिकांना शासनाच्या विविध आरोग्य सुविधा पुरविण्यात येत असतात. याच रुग्णालयात नवजात शिशुबालके, गर्भवती महिला व कोरोनाच्या लसींसह इतर सुविधा या रुग्णालयात पुरविल्या जातात. परंतु याच रुग्णालयात जाण्यासाठी धड रस्ताही नसून गटारींचे सांडपाणी रस्त्यावर येऊन पाण्याचे डबके साचते. तसेच पावसाळ्यात तर विचारायचीच सोय नसते. पावसाच्या पाण्यामुळे या परिसरात पाण्याच्या डबक्यासह चिखल व घाणीच्या साम्राज्यामुळे दुर्गंधी पसरलेली असते. यामुळे रोगराईला नुसतेच आमंत्रण मिळते. यामुळे या परिसरातील रहिवाशांसह रुग्णाच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्यविभागाने या गंभीर बाबींचा विचार करून या भागात रस्त्यांसह गटारींचे काम त्वरित करावे, अशी मागणी केली जात आहे.
----------------------------------