मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आकाशवाणी चौकात जाहीर सत्कार
By आकाश नेवे | Updated: September 20, 2022 19:07 IST2022-09-20T19:06:20+5:302022-09-20T19:07:30+5:30
Eknath Shinde : मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आकाशवाणी चौकात जाहीर सत्कार
जळगाव - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आकाशवाणी चौकात मनपा सभागृह नेते ललित कोल्हे आणि त्यांच्या परिवारातर्फे स्वागत करण्यात आले. त्यासोबतच भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आमदार स्मिता वाघ आणि रिपाइंचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. हा सत्कार स्वीकारून मुख्यमंत्री शिंदे हे पाळधी (ता. धरणगाव) येथील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.
मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. दुपारी ३.३० वाजता विमानतळावर मुख्यमंत्री शिंदे यांचा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर आकाशवाणी चौकात विजय कोल्हे, माजी नगराध्यक्ष सिंधू कोल्हे, मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, सरिता माळी-कोल्हे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी पियुष कोल्हे उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जल्लोष केला. त्यानंतर भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आमदार स्मिता वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना बैलगाडी देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेश महाजन, आमदार संजय सावकारे, नगरसेविका गायत्री राणे, उज्ज्वला बेंडाळे, दीप्ती चिरमाडे, नगरसेवक विशाल त्रिपाठी उपस्थित होते. त्यासोबतच काशीबाई उखाजी कोल्हे शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांचे आकाशवाणी चौकात स्वागत केले. या स्वागतासाठी चौक भगव्या रंगात सजविण्यात आला होता.
विमानतळावर महापौरांची उपस्थिती
महापौर जयश्री महाजन या विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताला उपस्थित होत्या. राजशिष्टाचार म्हणून शहरात येणारे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या स्वागतासाठी महापौरांनी उपस्थित राहणे आवश्यक असते. त्यानुसार यावेळी महापौर उपस्थित होत्या. विमानतळावर मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेश पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार लता सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे उपस्थित होते.
पाळधी ता. धरणगाव येथील विश्राम गृहाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री मुक्ताईनगरकडे जात असताना सुनील चौधरी आणि मित्र परिवारातर्फे पुन्हा एकदा त्यांचा सत्कार करण्यात आला. महामार्गावर कालिंका माता मंदिर चौकाच्यापुढे दोन ठिकाणी त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.