पाचोरा / चाळीसगाव : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल, अशी घोषणा कृषी मंत्री दादा भुसे यांनी शनिवारी पाचोरा येथे केली. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत, या मागणीसाठी रोहिणी, ता. चाळीसगाव येथे भाजप कार्यकर्त्यांनी कृषी मंत्र्यांचे वाहन अडवून त्यांना निवेदन दिले.
मंत्री भुसे यांनी चाळीसगाव पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची शनिवारी पाहणी केली. यानंतर पाचोरा येथे शिवसेना कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील घोषणा केली. यावेळी आमदार किशोर पाटील उपस्थित होते. मंत्री म्हणाले की, झालेल्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आठवडाभरात हे कामकाज पूर्ण होऊन किती हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे, हे समोर आल्यानंतर राज्यव्यापी नुकसानभरपाईचा निर्णय घेण्यात येईल.
केंद्र शासनाच्या पीक विमा योजनेत बदल व्हावेत म्हणून राज्य सरकारने बीड मॉडेल सादर केले होते. परंतु, केंद्र सरकारने त्याला परवानगी दिली नाही. आता तर तेच मॉडेल मध्य प्रदेश सरकारने स्वीकारले. शेतकऱ्याने पीक विमा कंपनीच्या नावे दिलेल्या पत्राची प्रत कृषी विभागात सादर केल्यास ते पत्र देखील ग्राह्य धरण्यात येईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, रोहिणी येथे भाजपच्या वतीने रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. भुसे यांचे वाहन अडवून त्यांना निवेदन दिले. मंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. रोहिणी रेल्वे अंडर पासमध्ये पाणी तुंबल्यामुळे ७ ते ८ गावांचा चाळीसगाव तालुक्याशी संपर्क तुटल्याची तक्रार आंदोलकांनी केली. त्यावर रेल्वे गेट खुले करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले.
110921\img_20210911_142627.jpg
पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे आमदार किशोर पाटील आणि आणि मान्यवर