भुसावळ (जि. जळगाव): इंदूर–हैदराबाद महामार्गाच्या बांधकामासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्याबदल्यात योग्य मोबदला मिळावा, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे (शिंदे गट) आमदारचंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. मंगळवारी हे आंदोलन तीव्र झाले असता पोलिस प्रशासनाने हस्तक्षेप करून आंदोलक शेतकऱ्यांसह आमदार पाटील यांनाही ताब्यात घेतले. आंदोलनक शेतकऱ्यांना भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले. तर आमदार चंद्रकांत पाटील यांना भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात दुपारी दोनच्या सुमारास आणण्यात आले. ही कारवाई विभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी स्वतः पोलीस ठाण्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नितीन पाटील, नितीन देशमुख, राजू सांगळे, वाहतूक शाखेचे एपीआय उमेश महाले आदी अधिकाऱ्यांसह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.