महापौर, उपमहपौर निवडीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:27 IST2021-03-04T04:27:51+5:302021-03-04T04:27:51+5:30
जळगाव - मनपाच्या महापौर व उपमहापौरांचा कार्यकाळ १८ रोजी संपणार असून, नवीन महापौर, उपमहापौर निवडीसाठी मनपा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे ...

महापौर, उपमहपौर निवडीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला
जळगाव - मनपाच्या महापौर व उपमहापौरांचा कार्यकाळ १८ रोजी संपणार असून, नवीन महापौर, उपमहापौर निवडीसाठी मनपा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. लवकरच विभागीय आयुक्तांकडून पिठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. महापौर निवडीची प्रक्रीया सुरू झाल्याने आता सत्ताधारी भाजपातही अंतर्गत हालचालींना गती आली आहे.
बजरंग बोगद्यासमोरील अतिक्रमण पुन्हा काढले
जळगाव - शहरातील बजरंग बोगद्यासमोरील अतिक्रमणावर सोमवारी कारवाई केल्यानंतर मंगळवारी देखील पुन्हा याठिकाणी दुकाने थाटण्यात आली होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. तसेच काही दुकानदारांना नोटीसा देखील बजाविण्यात आल्या आहेत.
एसएमआयटी महाविद्यालय रस्त्यालगत धुळीचे लोट
जळगाव -शहरातील एसएमआयटी महाविद्यालयाच्या रस्त्यालगत गेल्या दोन वर्षांपासून एका नाल्याचे काम सुरु आहे. अजूनही हे काम पुर्ण झालेले नाही. त्यातच खोदकामामुळे या भागातील रस्त्याचीही मोठी दुर्दशा झाली आहे. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात धुळ उडत असून, यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार केली असून, रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
नुकसानभरपाई देण्याची मागणी
जळगाव- गेल्या महिन्यात भोकर, भादली व कठोरा भागात झालेल्या वादळी पावसामुळे रब्बीच्या पीकांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाकडून पंचनामे देखील करण्यात आलेले नाहीत. प्रशासनाने या भागातील नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. याबाबत कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
गिरणेतून वाळू उपसा सुरुच
जळगाव - तालुक्यातील गिरणा नदीपात्राचे ठेके देण्यात आले असले तरीही नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरुच असून, प्रशासनाकडून या उपस्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. निमखेडी, नागझीरी, फुफनगरी या भागातून हा उपसा सुरु आहे. रात्रीच्या वेळेस हा उपसा सुरु असून, कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.