जळगाव : 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना अतिशय उत्तम असून, देऊळवाडेकरांनी याच्या माध्यमातून एकजुटीचे दर्शन घडविले आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून गावातील एकोप्याला चालना मिळत असल्याने इतर गावांनीदेखील याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील देऊळवाडे येथील गणरायाची आरती केल्यानंतर बोलत होते.
पालकमंत्र्यांच्याहस्ते गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. देऊळवाडे येथील ग्रामस्थांनी 'एक गाव एक गणपती' या संकल्पनेच्या अंतर्गत गावामध्ये एकाच गणरायाची स्थापना केली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या मंडळाला भेट देऊन गणरायाची आरती केली. शाळा खोलीचे बांधकाम, शाळेला संरक्षक भिंत, चावडी चौकात पेव्हर ब्लॉक बसविणे, सौर ऊर्जेवर चालणारी दुहेरी पंप योजना, व्यायामशाळेचे बांधकाम आदी कामे मंजूर करण्यात आली आहेत. यातील शाळा खोलीचे काम व संरक्षक भिंतीसह सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी पंप योजनेचे लोकार्पण करण्यात आले. उर्वरित कामांचे भूमिपूजन करण्यात आले. शाळा व परिसरात पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. विशेष म्हणजे हा कार्यक्रम भरपावसात झाला.
शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे, कानळदा येथील शिक्षण संस्था चेअरमन प्रकाश सपकाळे, भोलाणे येथील अशोक सपकाळे, धामणगाव येथील किरण सपकाळे, सरपंच सरस्वतीबाई सोनवणे, उपसरपंच सरूबाई सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते मुकेश सोनवणे, राजू सोनवणे, सारिका सोनवणे, सुनंदा सोनवणे, उत्तम सोनवणे, गेंदालाल सोनवणे, पोलीस पाटील संतोष सोनवणे, भीमराव पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन कोळी महासंघाचे अध्यक्ष मुकेश सोनवणे यांनी केले.