कार्यक्रम भाजपाचा, व्यासपीठावर राष्ट्रवादी अन् शिवसेनेचे कार्यकर्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST2021-08-18T04:21:23+5:302021-08-18T04:21:23+5:30
राज्यात शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी यांचे आपसातले संबंध जनतेकडून लपून नाहीत. मात्र, भुसावळमध्ये वेगळेच चित्र समोर येत ...

कार्यक्रम भाजपाचा, व्यासपीठावर राष्ट्रवादी अन् शिवसेनेचे कार्यकर्ते
राज्यात शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी यांचे आपसातले संबंध जनतेकडून लपून नाहीत. मात्र, भुसावळमध्ये वेगळेच चित्र समोर येत असून, प्रभात २० विकासकामांचे लोकार्पणानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सत्ताधाऱ्यांचे अर्थात भाजपा पदाधिकाऱ्यांवर स्तुतीसुमने उधळली. याशिवाय भुसावळमधील गुंडगिरी संपवण्याचा त्यांनी उच्चार करताना गाठ माझ्याशी आहे. कुठल्याही प्रकारची गुंडगिरी खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी स्वातंत्र्यदिनी नगरसेवक पिंटू ठाकूर यांच्या प्रभागातील विकासकामाच्या लोकार्पण वेळेस दिला.
याप्रसंगी व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण मुळे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उद्योजक मनोज बियाणी, प्रा. सुनील नेवे, जि.प.चे माजी सदस्य विश्वनाथ पाटील, नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर, माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, नगरसेवक युवराज लोणारी, बोधराज चौधरी, किरण कोलते, अमोल इंगळे, गिरीश महाजन, पुरुषोत्तम नारखेडे, सतीश सपकाळे, देव आणि शोभा नेमाडे, संतोष बारसे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार सावकारे यांच्यावर स्तुतीसुमने उधळत पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, आमदार संजय सावकारे यांचा कुणालाही त्रास नाही. त्यांचे कार्य नक्कीच कौतुकास्पद असल्याचेही पाटील म्हणाले, तसेच शहरामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अगदी अल्पवयीन मुलेही हातात कट्टा घेऊन फिरत आहेत, ही गंभीर बाब असून, यावर नक्कीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करू, तसेच शहरातील गुन्हेगारी वृत्तीला मुळीच थारा दिला जाणार नाही. ज्यांना ज्यांना शक्य आहे, त्यांना हद्दपार करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आल्या असून, काही लोक मुख्याधिकाऱ्यांना ते काम करत असताना त्रास देतात. मात्र, तुम्ही चांगले विकास काम करत राहा. पालकमंत्री म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असेही यावेळी पाटील म्हणाले.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घरी जाऊन पाटील यांनी त्यांची भेट घेतली.
सावकारे यांनीही भुसावळच्या
राजकारणावर काढले चिमटे
कार्यक्रमात व्यासपीठावरून बोलताना आमदार संजय सावकारे यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांना चांगलाच चिमटा काढला. ते म्हणाले की, नेमका कोण कुठे आहे हे समजायला मार्ग नाही. माजी मंत्री खडसे आले की, काही त्यांच्यासोबत, काही आमच्यासोबत तर काही शिवसेनेसोबत. नेमका कोण कुठे आहे, हे समजायला मार्ग नाही. यावेळी व्यासपीठावर उपस्थित पदाधिकाऱ्यांचे चेहरेही पाहण्यासारखे होते. येत्या पालिकेच्या निवडणुकीत कोण कोणासोबत आहे, हे स्पष्ट होणार आहे.