तालिबानची राजवट सुरू होताच इकडे ड्रायफ्रुट्सचे भाव वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST2021-08-22T04:19:45+5:302021-08-22T04:19:45+5:30
जळगाव : अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट सुरू झाली आहे. त्यामुळे या ठिकाणावरून येणारी ड्रायफ्रुटची आवक थांबली आहे. रोज या भागात ...

तालिबानची राजवट सुरू होताच इकडे ड्रायफ्रुट्सचे भाव वाढले
जळगाव : अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट सुरू झाली आहे. त्यामुळे या ठिकाणावरून येणारी ड्रायफ्रुटची आवक थांबली आहे. रोज या भागात तणाव वाढत असल्याने त्याचा परिणाम आयातीवर होत आहे. त्यामुळे जळगावात ड्रायफ्रुट्सच्या दरात किलोमागे १०० ते १५० रुपयांची वाढ झाल्याची स्थिती आहे.
अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबान्यांनी हळूहळू संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळविला आहे. या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात भारतात ड्रायफ्रुट्ची आयात होत असते. मात्र काही दिवसांपासून सुरू झालेल्या या तणावामुळे या मालाची आवक घटली आहे.
दोन आठवड्यांचा स्टाॅक शिल्लक
१) अफगाणिस्तानात तणाव वाढल्यामुळे ड्रायफ्रुटची आवक घटली असताना सुकामेव्याची विक्री करणाऱ्या अनेक दुकानांमध्ये दोन आठवड्यांचा स्टाॅक शिल्लक आहे. या दरम्यान तणाव कमी होऊन व्यवसाय पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे.
२) अफगाणिस्तानसोबत व्यापार बंद होईल असे होणार नाही. त्यावर काही तरी तोडगा निघणार आहे. मात्र व्यापार बंद झाल्यास या ठिकाणचे ड्रायफ्रुट हे व्हाया दुबई मार्गे भारतात येऊ शकतात. मात्र अशी स्थिती निर्माण झाल्यास काही प्रमाणात भाववाढ होऊ शकते.
३) तणावाची स्थिती असल्यामुळे सध्या अमृतसर मार्गे येत असलेला सुकामेव्याची वाहतूक थोडी अडचणीची होण्याची शक्यता आहे. मात्र त्यावरही काही दिवसात तोडगा निघण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे.
हे पाहा भाव (प्रति किलो)
पिस्ता : ८८० ते ९५० १०८० ते ११५०
जर्दाळू : ३०० ते ६०० ३५० ते ६५०
खिसमिस : ४०० ते ८०० ४५० ते ११००
अंजिर : ८०० ते १८०० १००० ते २०००
काळे मनुके : ३५० ४००
लवकरच दर पूर्ववत होतील
सध्या अफगाणिस्तानमध्ये तणावाची स्थिती आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर लवकरच हा तणाव कमी होईल. त्यानंतर ड्रायफ्रुटचा बाजार काही प्रमाणात सुरळीत होईल. सध्या किलोमागे ५० ते १०० रुपयांची वाढ आहे.
- सुरेश बरडिया, ड्रायफ्रुट्स व्यापारी
काजू व बदामात भाववाढ होत असताना आता पिस्ता, जर्दाळू, खिसमिस, अंजिर यांच्या भावात वाढ झाली आहे. सध्या सुकामेव्याला मागणी चांगली आहे. अफगाणिस्तानमधील स्थिती लवकर पूर्वपदावर येऊन व्यवहार सुरळीत होणे गरजेचे आहे.
- सागर बारी, किराणा व्यापारी