हिरव्या मिरचीचा भाव ८ रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:19 IST2021-08-26T04:19:01+5:302021-08-26T04:19:01+5:30
भाजीपाल्याचे दर गडगडले : शेतकऱ्यांवर माल फेकण्याची वेळ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात पावसाने जरी पाठ फिरवली असली ...

हिरव्या मिरचीचा भाव ८ रुपये किलो
भाजीपाल्याचे दर गडगडले : शेतकऱ्यांवर माल फेकण्याची वेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात पावसाने जरी पाठ फिरवली असली तरी झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक बाजारात वाढली आहे. यामुळे भाजीपाल्याच्या दरात लक्षणीय घट झाली असून, हिरव्या मिरचीचा दर ८ ते १० रुपये किलोपर्यंत खाली आला आहे. कमी झालेल्या भाजीपाल्याच्या दरामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च निघणे देखील कठीण झाले आहे.
शेतातून भाजीपाला काढण्यापासून ते बाजार समितीमध्ये किरकोळ विक्रेत्यांना माल विक्रीपर्यंतचा शेतकऱ्यांना लागणारा खर्च निघणे देखील कठीण झाले आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच भाजीपाल्याच्या दरात एवढ्या मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पावसाळ्यात भाजीपाल्याची आवक ही वाढत असते. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात घट येते, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात घट येत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जळगाव शहरात येणाऱ्या भाजीपाल्याच्या आवकमध्ये प्रचंड वाढ झाली असल्याने दर कमी झाले आहेत. फुलकोबी, पत्ताकोबीच्या दरातही घट झाली आहे. पत्ताकोबी ८ रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे, तर टोमॅटोही १५ रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहेत.
कोणत्या भाजीला काय भाव
भाजी - शेतकऱ्याचा भाव - ग्राहकाला मिळणारा भाव (किलोप्रमाणे)
वांगे - २५ - ४०
टोमॅटो - १० - २०
भेंडी - १० - २०
चवळी - २० - ४०
कोथिंबीर - २० - ४०
पालक - १० - २०
मेथी - २० - ३०
हिरवी मिरची - ४ - ८
पत्ताकोबी - ५ - १०
फुल कोबी - १० - २०
बटाटे - १० - २५
शेतकऱ्यांचा खर्च निघेना
भाजीपाला असो की धान्य, हे पीक आता शेतकऱ्यांना न परवडणारे आहेत. ज्या वर्षी हंगाम चांगला येतो त्यावर्षी बाजारात भाव मिळत नाही. हंगाम वाईट आला की भाव चांगला मिळतो. आता हंगाम चांगला आहे, मात्र बाजारात सर्वदूर आवक वाढल्याने भाव नाही. माल फेकण्यापेक्षा विक्री केलेलाच बरा.
- किशोर परदेशी, शेतकरी
भाजीपाल्याची आवक वाढल्याने कवडीमोल भावात माल विक्री करावा लागत आहे. त्याशिवाय दुसरा पर्याय देखील नाही. माल विक्री केला नाही तर तो माल फेकावा लागेल. फेकला तर बाजारात जी रक्कम मिळत आहे. ती देखील मिळणार नाही. त्यापेक्षा नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करावा लागत आहे.
-राकेश चौधरी, शेतकरी
ग्राहक काय म्हणतात
सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत. त्यात भाजीपाल्याचे दर थोडे कमी झाले असले तरी ते तात्पुरतेच असतात. आवक कमी होताच हे दर देखील वाढतात. आज भाजीपाला परवडत असला तरी तो कायमच परवडतो असे नाही.
- आशा चौधरी, ग्राहक
भाजीपाल्याचे दर पावसाळ्यात कमीच होत असतात. यावर्षी देखील आता कमी झाला आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. अशाच प्रकारचे दर कमी राहिल्यास सर्वसामान्य ग्राहकांना यामुळे फायदा होतो. मात्र, हे दर काही महिन्यांपुरतेच कमी होतात. मात्र, त्यानंतर पुन्हा वाढतात.
- छाया पाटील, ग्राहक
भावात एवढा फरक का?
सध्या बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्या ठिकाणी लिलावानुसार किरकोळ व्यापारी शेतकऱ्यांकडून माल खरेदी करतात. आवक जास्त असल्याने व स्पर्धाही असल्याने कमी भावात शेतकरी आपला माल विक्रेत्यांना देत आहेत. बाजारात माल विक्री करताना किरकोळ विक्रेत्यांनाही फायदा व्हावा म्हणून शेतकऱ्यांचा माल व ग्राहकांना विक्री होणाऱ्या मालातील भावात फरक असतो.