विद्युत खांबाच्या निधीला आता प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:37 IST2021-09-02T04:37:36+5:302021-09-02T04:37:36+5:30
दोन दिवसांत महावितरणकडे वर्ग होणार निधी : कामाला अजून आठवडाभराची प्रतीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या अनेक महिन्यांपासून ...

विद्युत खांबाच्या निधीला आता प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा
दोन दिवसांत महावितरणकडे वर्ग होणार निधी : कामाला अजून आठवडाभराची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या अनेक महिन्यांपासून शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला मुख्य अडथळा ठरलेला विद्युत खांब हटविण्याच्या कामाला राज्य शासनाने निधी मंजूर करून दिल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांचा प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्र प्राप्त होताच महापालिका निधी वर्ग करण्यासाठी प्रक्रिया सुरू करणार आहे. त्यानंतरच या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यासाठी अजून आठवडाभराचा वेळ खर्ची होणार आहे.
शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या कामात प्रमुख अडथळा ठरलेला विद्युत खांब हटविण्याचे काम लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे. या कामासाठी २५ कोटींतून दीड कोटींच्या कामाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भात शासनाचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी काम मंजुरी संदर्भात प्रशासकीय मान्यता प्रदान करणार आहेत. यासाठी महापालिकेला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. गुरुवारी याबाबत प्रशासकीय मान्यता मिळण्याची शक्यता आहे. मनपाचे कर्मचारी यासाठी बुधवारी पूर्णवेळ जिल्हाधिकारी कार्यालयात थांबलेले होते. महापालिकेकडे यासंदर्भात आदेश प्राप्त होताच निधी वर्ग करण्यासंदर्भात आयुक्तांची मान्यता घेऊन महावितरणकडे दीड कोटींचा निधी वर्ग केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. निधी वर्ग करण्याची प्रक्रिया ही एका दिवसाची असल्याने तातडीने कामाला देखील सुरुवात होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.