नांद्रा येथे होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनाला स्थगिती, तहसीलदारांनी लावली तातडीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:17 IST2021-07-28T04:17:15+5:302021-07-28T04:17:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुरंगी, ता. पाचोरा : नांद्रा येथे २८ रोजी होणारे रास्तारोको आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे. ...

नांद्रा येथे होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनाला स्थगिती, तहसीलदारांनी लावली तातडीची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरंगी, ता. पाचोरा : नांद्रा येथे २८ रोजी होणारे रास्तारोको आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान, तहसीलदारांनी २८ रोजी तातडीची बैठक बोलवली आहे.
जळगाव ते चांदवड या दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर नांद्रा गावाजवळील खोळंबलेल्या रस्त्याचे काम तसेच विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी नांद्रा ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी २८ जुलै रोजी नांद्रा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये व प्रांताधिकारी कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार कैलास चावडे यांनी त्यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, नायब तहसीलदार संभाजी पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती नितीन तावडे, सरपंच विनोद पाटील, माजी सरपंच सुभाष तावडे, माजी सरपंच शिवाजी तावडे, ग्रामपंचायत सदस्य आनंदा बाविस्कर, यशवंत पवार, किशोर पाटील, अभिमन पाटील, संतोष ब्राम्हणे, अशोका बिडकॉनतर्फे इंजिनियर बोरसे हे उपस्थित होते.
निवेदनातील मागणीप्रमाणे दलित वस्तीत जाणारे शेतातील पाणी पाईप टाकून बाहेर काढण्याचे तसेच विष्णुदास महाराज यांच्या आश्रमाकडे जाणाऱ्या रस्त्यात पाईप टाकून २५० मीटर रस्ता करून देण्याचे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील रस्ता व्यवस्थित करून देण्याचे ठरले. त्याचप्रमाणे बसस्थानकावर तोडलेली स्वच्छतागृहे व दलित वस्तीसमोरील रस्ता ताबडतोब पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता यांच्याकडे प्रस्ताव पाठवून मंजूर करून घेण्याचे ठरले. यासंदर्भात २८ रोजी पुन्हा राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांसमवेत तहसीलदारांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामुळे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे.