जळगाव : नांदगाव ते जळगाव या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून रस्त्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता चांगला झाला असला तरी शिरसोली नाका ते रायसोनी काॅलेज दरम्यानच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून वाहनधारकांचे हाल होत आहेत.
जळगाव ते नांदगाव या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात आले आहे. या मार्गाचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र ईच्छादेवी चाैफुली ते रायसोनी काॅलेज दरम्यान असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.
शिरसोली नाका ते गायत्री नगर दरम्यान कसरत
ईच्छादेवी चाैफुली ते गायत्री नगर या दरम्यान दोन्ही बाजूंचा रस्ता खराब झाल्यामुळे वाहनधारकांची मोठी कसरत होत आहे. या मार्गावर रस्त्यापेक्षा खड्डेच जास्त असल्याने वाहन निकामी होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. यासोबत या रस्त्यावर टोकदार खडी वर आल्यामुळे टायर पंक्चर होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने सारखीच परिस्थिती असल्यामुळे या मार्गावर वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात कसरत होत आहे.
गायत्री नगर ते सेंट टेरेसा शाळेदरम्यान खोदला रस्ता
याच रस्त्यावर गायत्री नगर ते सेंट टेरेसा शाळेपर्यंत महापालिकेच्या अमृत व मलनिस्सारण योजनेच्या कामासाठी अर्धा रस्ता खोदून ठेवला आहे. या रस्त्याची व्यवस्थित दबाई न झाल्याने हा रस्ता खालीवर झालेला आहे. त्यातच रस्त्यावर माती येत असल्यामुळे चिखल होऊन वाहने घसरण्याचा धोका या मार्गावर आहे. त्यातच रात्रीच्या वेळी या ठिकाणी असलेले पथदिवे बंद असल्यामुळे अपघाताचा धोका जास्त आहे.
मधोमध खाेदलेल्या रस्त्यामुळे हाल
हाजी मलंग शहा बाबा यांच्या दर्ग्याच्या अलीकडे असलेल्या एका अपार्टमेंटजवळ रस्त्याच्या मधोमध चरी खोदण्यात आली आहे. ही चरी खोदल्यानंतर ती व्यवस्थित न बुजली गेल्यामुळे मोठा खड्डा पडलेला आहे. त्यामुळे वेगाने येणारे वाहन या चरीजवळ आल्यानंतर वाहन जम्प करीत असते. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने ही चरी तत्काळ बुजवावी अशी मागणी होत आहे.
महापालिकेची खड्डे दुरुस्ती गेली वाहून
महापालिकेने गायत्री नगरच्या अलीकडे असलेल्या नाल्याजवळील खड्ड्यांची डांबर व बारीक खडी टाकून काही दिवसांपूर्वी दुरूस्ती केली होती. मात्र, एका दिवसात दुरुस्ती केलेले खड्डे पुन्हा ‘जैसे थे’ झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणची समस्या कायम आहे. त्यातच महापालिकेने मोहाडी व शिरसोलीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध चरी खोदून ठेवली आहे. मात्र, व्यवस्थित दबाई न झाल्यामुळे बुजलेल्या चरीमुळे मोठा गतिरोधक तयार झाला आहे.
श्रीकृष्ण लाॅनजवळील समस्या कायमची
श्रीकृष्ण लाॅनजवळ रस्त्यावर पाणी आल्यामुळे संपूर्ण रस्ता खराब झाला आहे. याठिकाणी पावसाचे पाणी व्यवस्थित काढण्यात न आल्यामुळे पाणी साचून रस्त्याची दुरवस्था होत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी हा रस्ता खराब होत असतो. याठिकाणी दोन्ही बाजूने गटार तयार करून पाण्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याची आवश्यकता आहे.