मतदान केंद्रांचे ठिकाण ममुराबाद येथे बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:47 IST2021-01-08T04:47:02+5:302021-01-08T04:47:02+5:30
ममुराबाद : ग्रामपंचायतीच्या १७ जागांकरीता होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा मतदारांच्या सोयीसाठी सर्व सहा वार्डात एकूण आठ मतदान केंद्रांची ...

मतदान केंद्रांचे ठिकाण ममुराबाद येथे बदलले
ममुराबाद : ग्रामपंचायतीच्या १७ जागांकरीता होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा मतदारांच्या सोयीसाठी सर्व सहा वार्डात एकूण आठ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. वाढती मतदार संख्या लक्षात घेता एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी महसूल विभागाने सदरचा बदल केल्याचे सांगितले जात आहे.
ममुराबाद येथे वार्ड क्रमांक तीनमधील खंडेरावनगरात असलेल्या जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेच्या खोल्यांमध्ये एरवी लोकसभेसह विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात येते. मात्र, एकाच ठिकाणी त्यामुळे मतदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन गोंधळ निर्माण होत असल्याचे लक्षात घेऊन महसूल विभागाने यंदा होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी जि.प. प्राथमिक शाळेशिवाय अन्य ठिकाणी मतदान केंद्र कार्यान्वित करण्याचे नियोजन केले आहे. त्यात तलाठी कार्यालयासह पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, रामगंगानगरातील अंगणवाडी त्याचप्रमाणे उर्दू शाळेजवळील अंगणवाडीचा समावेश आहे. संबंधित सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक ती सर्व सुविधा उपलब्ध केली जाणार असून मतदारांना त्यांच्या वार्डातच त्यामुळे मतदान करणे शक्य होणार आहे. तसेच गर्दी कमी झाल्याने निवडणूक यंत्रणेवरील ताणसुद्धा कमी होऊ शकणार आहे. मात्र, बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांचा ताण काहीअंशी वाढण्याची चिन्हे आहेत.
- वार्डनिहाय मतदान केंद्रे (कंसात संख्या)
वार्ड एक- तलाठी कार्यालय (एक), वार्ड दोन- जि.प.प्राथमिक शाळा (एक), वार्ड तीन- पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय (दोन), वार्ड चार- जि.प. प्राथमिक शाळा (एक), वार्ड पाच- रामगंगानगर अंगणवाडी (दोन), वार्ड सहा- उर्दू शाळेजवळील अंगणवाडी (एक).
-------------------------