Political games will now have limits ... | राजकीय खेळींना आता मर्यादा येणार...
राजकीय खेळींना आता मर्यादा येणार...

आनंद सुरवाडे ।
जळगाव : जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाचे आरक्षण महिला (खुले) निश्चित झाल्याने जिल्हा परिषदेत वेगळ्या सत्तासमीकरणाच्या आशा धुसर झाल्याचे चित्र आहे़ अध्यक्षपद खुले निश्चत झाले असते तर स्पर्धा वाढून राजकीय खेळींना उत आला असता आता मात्र, पक्षाकडून दिलेल्या उमेदवारांना पक्षाचा आदेश माणून स्वीकारले जाईल, असे सदस्यांच्या एकंदरीत हालचालींवरून स्पष्ट होत आहे़
जिल्हा परिषदेत निधीच्या मुद्दयावरून नाराज गटाची भूमिका महत्त्वाची ठरेल असे संकेत होते, मात्र, या सदस्यांचा पक्षांना नव्हे अध्यक्ष, उपाध्यक्षांना अधिक विरोध दिसून येत आहे़ त्यामुळे पक्षाने दुसरा उमेदवार दिल्यास हा गट बाहेर पडण्याची शक्यता मावळण्यात जमा आहे़ शिवाय अशा स्थितीत राष्ट्रीय व सेना काही राजकीय खेळी खेळेल का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे़ आकड्यांची जुळवाजुळव सोपी नसल्याने सेना, राष्ट्रवादी यात कितपत रस घेईल? हे बघावे लागणार आहे़ असा सूर जि़प़च्या राजकीय वर्तुळात उमटत आहे़
भाजपकडून यांची नावे चर्चेत
भाजपकडून बांधकाम सभापती रजनी चव्हाण, विद्या खोडपे, नंदा पाटील, माधुरी अत्तरदे आदी नावे चर्चेत आहेत़ यातही रजनी चव्हाण यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे़
चर्चेतील नावांना विरोध
चर्चेतील एका नावाला काही सदस्यांचा विरोध असून हा विरोध स्पष्ट दर्शवून काँग्रेस- शिवसेना- राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन वेगळी सत्ता बसू शकते, असे संकेत काही सदस्यांनी दिले आहेत़ यात सेना किंवा राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद देऊन त्यांचा पाठिंबा मिळविला जाईल व एका गटाला सत्तेपासून दूर ठेवले जाईल, या समिकरणावरही अभ्यास सुरू असल्याचे समजते़ मात्र, जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष भाजपचाच होईल, असा दावा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी केला आहे़ यासह काँग्रेसचे आरोग्य सभापती दिलीप पाटील यांचे बंधू आधिच भाजपात गेल्याने त्यांची भूमिका अजुनतरी अस्पष्ट आहे़ त्यामुळे काँग्रेस पाठिंबा काढून घेण्याचे संकेतही धुसर दिसत आहे़ चाळीस सदस्यांना अन्य सदस्यांपेक्षा अधिक निधी दिल्याचा दावा अध्यक्षांनी केला आहे, बहुमतासाठी आवश्यक ३४चा आकडा गाठणे भाजपला तेवढे कठीण नसल्याचे यावरून दिसते, त्यामुळे काँग्रेस, भाजपला पाठिंबा देणारे राष्ट्रवादीच्या सदस्यांची भूमिका आता महत्त्वाची ठरेल़ अध्यक्ष निवडीनंतर काहीच दिवसात उपाध्यक्ष व समिती सभापतींची निवडही होणार आहे़

महाशिवआघाडीचे समीकरण अंधारात
शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस या तिघांनी मिळून सत्ता स्थापन करण्याचे ठरविले तरी त्यांच्याकडे ३२ सदस्य होतात़ बहुमताचा आकडा त्यांना गाठता येत नाही़ निधीच्या मुद्दयावरून भाजपचा एक गट बाहेर पडल्यास हे शक्य होईल, नाराज सदस्य अध्यक्षनिवडीच्या वेळी गैरहजर राहिल्यास हे समिकरण शक्य आहे़ मात्र, हा गटही पदाच्या अपेक्षेत असेल, जर गैरहजर राहून महाशिवआघाडीला पाठिंबा या गटाने दिला तर त्यांना पद मिळण्याची शक्यता नाही, भाजपमध्येच राहुन किमान समिती सभापतीपद पदरात पाडून घेत हा गट फूटण्याची शक्यता कमी आहे़ शिवाय आरक्षण महिला राखीव असल्याने राजकीय खेळ्यांना ब्रेक बसेल़ यामुळे सध्याच्या समीकरणांवरून व्हीप न बजावताच अध्यक्ष निवड पार पडण्याचे संकेत अधिक असून महाशिवआघाडीचे समीकरण अंधारात असल्याचे चित्र आहे़ शिवाय निधीवरून नाराज सदस्यांमध्ये कॉंग्रेसचे कुणी नाही, त्यामुळे ते सत्तेतून बाहेर पडण्याी शक्यता कमी आहे़

जर महाशिवआघाडी झालीच तर काय?
शिवसेनेच्या रेखा राजपूत, राष्ट्रवादीच्या जयश्री पाटील, सरोजनी गरूड, डॉ़ निलम पाटील यांची नावे चर्चेत राहतील़ यात गेल्या निववडणुकीत राष्ट्रवादीच्या जयश्री पाटील यांचा अध्यक्षपदाच्या शर्यतीत दहा मतांनी पराभव झाला होता़ काँग्रेसने भाजपला मतदान केले होते तर राष्ट्रवादीचे तीन सदस्य गैरहजर राहिले होते़

Web Title: Political games will now have limits ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.