पोलिसावर रिक्षाचालकाचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:48 IST2018-09-02T00:47:58+5:302018-09-02T00:48:41+5:30
आरोपीने स्वत:च्या हातावर केला वार : फैजपुरात रिक्षाचालकाची मुजोरी

पोलिसावर रिक्षाचालकाचा हल्ला
फैजपूर, जि.जळगाव : फैजपूर (ता.यावल) येथील बसस्थानकाबाहेर रिक्षा चालकाला पोलिसांनी रिक्षा बाजूला लावण्याचे सांगितल्याने रिक्षाचालकाने पोलिसांवर हल्ला करत त्यांना मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. पोलिसाला मारहाण केल्यानंतर उलट रिक्षाचालकाने स्वत:च्या हातावर कटरने वार करत जखमी करून घेतले. या घटनेने खळबळ उडाली.
खाकीवरच हल्ला होत असताना सामान्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. यात फिर्यादी कॉन्स्टेबल महेंद्र महाजन यांच्यावर हल्ला करणारा आरोपी रिक्षाचालक शाहरुख शेख करीम याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसस्थानकासमोर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा उभ्या असताना शनिवारी सकाळी ११ वाजता शाहरुख शेख करीम याला सुधाकर महाजन व कॉन्स्टेबल उमेश सानप यांनी रिक्षा बाजूला लावण्याचे सांगितले. याचा राग आल्याने शाहरुख याने रिक्षाच्या सिटवर बसून रिक्षाच्या समोरील काच लाथ मारून फोडली. त्यानंतर पोलीस महाजन यांच्यावर फायटरने हल्ला चढविला. त्यामुळे महाजन यांच्या उजव्या बरगडीला गंभीर दुखापत झाली. याप्रसंगी बसस्थानकाबाहेर मोठा जमाव झाला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच फौजदार जिजाबराव पाटील व सहकारी घटनास्थळी धावले. जमाव पांगविला. पोलिसांनी शाहरुख याला तुझ्या विरुद्ध कारवाई करू, असे सांगितले. तेव्हा त्याने स्वत:च्या उजव्या हातावर धारदार कटरने वार करून जखमी करून घेतले व सेवा बजावत असलेल्या पोलिसांना मी तुमच्याविरुद्ध खोटी तक्रार करून तुम्हाला पोलीस खात्यातून निलंबित करायला लावेल, अशी धमकी दिली. सुधाकर महाजन यांच्या फिर्यादीवरून शाहरुख याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, ३३३,५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोनि दत्तात्रय निकम, जिजाबराव पाटील करीत आहे. डीवायएसपी राजेंद्र रायसिंग, दत्तात्रय निकम यांनी घटनेची माहिती घेतली. त्यांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांची कुंडली जमा करणे सुरू केले आहे. त्यांच्यावर हद्दपारी व मोक्कासारखी कारवाई करण्याचे प्रस्ताव पाठवले जातील, असे सांगितले.