पोलिस दादाला मिळणार हक्काचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:47 IST2021-01-08T04:47:38+5:302021-01-08T04:47:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : घरापासून वंचित असलेल्या पोलिसांना लवकरच हक्काचे घर मिळणार असून मुख्यालयात कर्मचाऱ्यांसाठी २ बीएचकेचे २५२ ...

पोलिस दादाला मिळणार हक्काचे घर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : घरापासून वंचित असलेल्या पोलिसांना लवकरच हक्काचे घर मिळणार असून मुख्यालयात कर्मचाऱ्यांसाठी २ बीएचकेचे २५२ तर अधिकाऱ्यांसाठी ३ बीएचकेचे ५६ निवासस्थानांचे काम पूर्णत्वास आले आहे. सात मजली अशा २३ इमारती उभारण्यात येत आहेत. एका इमारतीत ४२ घरे तसेच लिफ्टची सुविधा आहे. पहिल्या टप्प्यात २५२ घरे उभारण्यात आलेली आहे. ६२ कोटी ४५ लाखाचा निधी पहिल्या टप्प्यासाठी मिळालेला असून त्यातून हे काम सुरु आहे. एकूण ९२४ घरांचा हा प्रस्ताव आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांच्यामार्फत हे प्रकल्प केले जाणार आहेत. तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी पुढाकार घेऊन हा प्रस्ताव मार्गी लावला होता. निवासस्थानासह विविध कार्यालय व सुविधांसाठी २७५ कोटींचा प्रस्ताव होता, त्यात आता वाढ झाली आहे.
पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) यांच्या निवासस्थानासह डॉग युनीटसाठी १ कोटी ६६ लाख रुपयांचा प्रस्ताव आहे. याच आवारात राखीव पोलीस निरीक्षक, बॉम्ब शोध व नाशक पथकाचे कार्यालय व लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय साकारले जाणार आहे. याशिवाय मोटार परिवहन कार्यालय, वर्कशॉप व ८२ चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र शेड उभारले जाणार आहे.
इन्फो
कॉन्फरन्स व रेकॉर्ड रुम, मागील बाजूस तीन मजली इमारत उभारली जाणार आहे. त्यात इमारतीत महिला तक्रार निवारण कक्ष, गुन्हे दोष सिध्दी कक्ष, आर्थिक गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी शाखा, संगणक कक्ष, सीसीटीएनएस कार्यालय, मानव संसाधन विभाग, बिनतारी संदेश कक्ष, १०० व्यक्तींसाठी कॉन्फरन्स सभागृह, १०० जणांचा भोजन कक्ष आदी एकाच छताखाली येणार आहे.