पोळा : जीवाच्या मैतराचा सण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:20 IST2021-09-04T04:20:34+5:302021-09-04T04:20:34+5:30

श्रावण महिन्यात सणांची रेलचेल पाहायला मिळते. अनेक सण या महिन्यात आपल्याला भेटीला येतात. पावसाचे दिवस असल्याने सृष्टी आधीच हिरवाईचा ...

Pola: Festival of Friendship of Life .. | पोळा : जीवाच्या मैतराचा सण..

पोळा : जीवाच्या मैतराचा सण..

श्रावण महिन्यात सणांची रेलचेल पाहायला मिळते. अनेक सण या महिन्यात आपल्याला भेटीला येतात. पावसाचे दिवस असल्याने सृष्टी आधीच हिरवाईचा शालू नेसून नवीकोरी झालेली असते. संपूर्ण वातावरणात एक गारवा पसरल्याने मानवी मनदेखील ताजंतवानं झालेलं असतं.

अशा या श्रावण महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यासारखे सण साजरे करतो आणि या श्रावण महिन्याची सांगता होते ती श्रावण महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या पोळा या सणाने. बळीराजाचा आनंदाचा दिवस.

श्रावण अमावास्येला अर्थात पिठोरी अमावास्येला शेतकरी बांधव आपल्या सर्जाराजाचा हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. विदर्भ, खान्देशात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. महाराष्ट्रात बळीराजा मात्र आपल्या जिवाभावाच्या सोबत्याचा हा सण अत्यंत पारंपरिक पद्धतीने आजही साजरा करताना दिसतो. हा आपल्या मातीशी जोडणारा सण आहे. ही संस्कृती आपणच जपायला हवी. आमच्याकडे घरी दोन-दोन जोड्या होत्या. काका, वडील बैलांना आमंत्रण द्यायचे. पोळा या सणाच्या आदल्या दिवशी बैलांना रीतसर आमंत्रण देण्याची पद्धत आहे. त्याला खांदेमळणी म्हणतात.

“आज आमंत्रण देतोय ते घ्या आणि उद्या जेवायला या!” असं कानात सांगतात. असं आमंत्रण या बैलांना दिलं जातं. दुसऱ्या दिवशी सकाळी बैलांना नदीवर न्यायचं, त्यांना झकास अंघोळ घालायची. घरी आणल्यावर त्यांच्या सर्वांगावर गेरूने ठिपके द्यायचे, शिंगांना बेगड, रंग, डोक्याला बाशिंग,

गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा घातल्या जातात. पायांमध्ये चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालतात. नवी वेसण, नवा कासरा घातल्यानंतर अंगावर रेशमी नक्षीकाम केलेली झूल पांघरली जाते. बैलांचा गोठा स्वच्छ करण्यात येतो. घरातील सुवासिनी बैलांची विधीवत पूजा करतात.

बैलांना पोळ्याच्या दिवशी कोणतेही काम करू दिले जात नाही.

पुरणपोळीचा त्याला नैवेद्य दाखविला जातो. बैलाची कायम निगा राखणाऱ्या सालदाराला नवे कपडे दिले जातात. जेवण दिल जाते. मालक सालदाराबरोबरच जेवतात. भेद नसतो. बैलांचे जेवण झाल्यानंतर सायंकाळी त्यांना गावाबाहेर मंदिरात नेले जाते. बऱ्याच गावांत नदीच्या काठावर बैलांना आणले जाते.

सर्व शेतकरी आपापल्या जोड्या घेउन या ठिकाणी एकत्र येतात. आंब्याच्या पानांचे तोरण बांधून बैलांना रांगेत उभे करण्यात येते. ढोल-ताशे, नगारे वाजविले जातात. गावचा पोलीस पाटील तोरण तोडतील आणि पोळा फुटतो. पोळ्याची गीतं म्हटली जातात. येथे बैलांच्या शर्यतीदेखील आयोजित केल्या जातात. ज्याच्या जोडीला सर्वांत चांगले तयार केले असेल त्या जोडीला पारितोषिक दिले जाते.

आपापल्या गावातील परंपरेनुसार उत्सव साजरा झाल्यानंतर कार्यक्रम संपन्न होतो. घरी निघताना बैलांना घरोघरी नेले जाते. तेथे घरोघरी बैलांची पूजा करतात. औक्षण करतात. पुरणपोळीचा घास भरवितात. बैल नेणाऱ्यास ओवाळणी (पैसे) देतात. आपल्या संस्कृतीत वृक्षांप्रमाणेच वन्यजीवांनादेखील पूजनीय मानले जाते. वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलाप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणून पोळा या सणाकडे आपण पाहतो. पूर्वापार चालत आलेल्या रूढीपरंपरांप्रमाणे हे उत्सव आजही गावागावांमधून साजरे होताना आपल्याला दिसताहेत; पण पहिल्यासारखा उत्साह वाटत नाही. त्याला अनेक कारणे आहेत.

बहुतेक कामे मशीन, ट्रँक्टरच्या साह्याने होत असल्याने बैलांची संख्याही रोडावली आहे. शहरी भागात तर पोळा सण आला-गेला अशीच अवस्था असते. अजूनही बऱ्याच घरात मातीच्या बैलजोडी आणून पूजा करतात. जोपर्यंत शेती-शेतकरी आहे, तोपर्यंत पोळा आणी बैलपोळ्याचे महत्त्व टिकून राहणार आहे. ते जिवाभावाचे नाते आहे, हे सांगायला नको.

बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेत म्हणतात- ‘आला आला शेतकऱ्या, पोयाचा रे सण

मोठा, हाती घेईसन वाट्या, आता शेंदुराले घोटा, आता बांधा रे तोरण, सजवारे घरदार..।’

Web Title: Pola: Festival of Friendship of Life ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.