जामनेर : पिस्तुलराव महाजनांची दहशत असून त्यांच्या पोरांना शोधतोय अशी मिश्कील टिप्पणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जामनेर येथे केली.परिवर्तन यात्रेनिमित्त शनिवारी येथे सभा झाली. वाकीरोडवर दुपारी तीनवाजता सुरु होणारी सभा साडेचार वाजता सुरु झाली. येथे आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्यासह भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला.धनंजय मुंडे यांनी जामनेर नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी आल्याची आठवण करुन देत सांगितले की, सभा जोरदार झाली, गर्दीही मोठी होती मात्र उमेदवार निवडून आले नाही. हा पराभव राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नाही तर तो लोकशाहीचा पराभव होता. एका मताला ५ हजार रुपये दिल्याचा तो विजय होता. राष्ट्रवादीचा नाद करु नका, कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न करु नका. २०१९ मध्ये निवडून येऊन दाखवाच, असे आव्हनही मुंडे यांनी दिले.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाजन यांना लक्ष्य करीत सांगितले की, सत्तेची मस्ती डोक्यात शिरली की त्याला वाटते मी जाईल तिथं विजय मिळवीन. साडेचार वर्षात तुम्ही मतदार संघातील पाण्याची समस्या मिटवू शकला नाही. तापीचे पाणी तालुक्यात आणण्याची निव्वळ घोषणा केली. जिल्ह्यातील धरणांच्या कामांना निधी दिला नाही. बारामती जिंकण्याचे म्हणता, काहीतरी काळंबेरं दिसतय, कुठेतरी गडबड वाटतेय, तपासून पाहिले पाहिजे, असेही पवार म्हणाले.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी, संजय गरुड, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, ईश्वर बाळबुधे यांची भाषणे झाली. किशोर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. गफ्फार मलीक, कल्पना पाटील, सरोजनी गरुड, डॉ.ऐश्वरी राठोड, प्रमोद पाटील, अभिषेक पाटील, पारस ललवाणी, अॅड.ज्ञानेश्वर बोरसे, पप्पू पाटील, किशोर खोडपे, प्रल्हाद बोरसे, प्रभू झाल्टे, विनोद माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पिस्तुलराव महाजनांची जामनेरात दहशत - धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 23:58 IST