जळगाव : वाळूचा व्यवसाय करणाऱ्या सोनू आढाळे याने रस्त्याने जाणाऱ्या अर्जुन रोहिदास राठोड (२२, रा. पंचमुखी हनुमान मंदिर परिसर) या तरुणाला अडवून डोक्याला पिस्तूल लावून धमकावल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी ४ वाजता रायसोनी नगरात घडला. पिस्तूलबाबत पोलिसांनी इन्कार केला आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रारदार तरुण व संशयित या दोघांची तब्बल दोन तास चौकशी करण्यात आली.
या घटनेबाबत अर्जुन रोहिदास राठोड याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी रायसोनी नगरातील एका ड्रायव्हिंग स्कूल चालकाच्या घरी जात असताना वाळूचा व्यवसाय करणाऱ्या सोनू आढाळे याने मेडिकलजवळ अडवून तू माझ्या वाहनावरील चालकाला का पळविले आणि दुसऱ्या वाहनावर परत कामाला लावून दिले असा जाब विचारला, त्यावर कोणता चालक, मी ओळखत नाही, हे प्रकरण माहीत नाही असे सांगितले असता सोनू याने कमरेतून पिस्तूल काढून डोक्याला लावत शिवीगाळ केली. तेथे वाद झाल्यानंतर आपण थेट रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
तक्रारदार व संशयित दोघांची चौकशी
या घटनेनंतर पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी राठोड याचे म्हणणे ऐकून घेतले तर दुसरीकडे ठाणे अंमलदाराने तक्रारही घेतली. त्यानंतर सोनू आढाळे यालाही पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. निरीक्षक शिंदे यांनी दोघांची वैयक्तिक चौकशी केली. आढाळे याने आमच्यात वाद झाला, मात्र पिस्तूल नव्हते असे सांगितले. पोलिसांनी अन्य काही जणांकडूनही चौकशी केली. तक्रारदार राठोड मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम होता. यावेळी पोलीस ठाण्यात दोन्हीकडील लोक मोठ्या संख्येने जमलेले होते. सत्यता पडताळणीसाठी काही जणांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्याची मागणी केली. दरम्यान, याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
कोट...
तक्रारदार व ज्याच्यावर आरोप आहे, अशा दोघांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यांची वेगवेगळी चौकशी केली. चालक पळविल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आहे, परंतु पिस्तूलचा वापर झाला नसल्याचे निष्पन्न झाले.
- विजय शिंदे, पोलीस निरीक्षक