नाशिवंत देह जाणार सकळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:22 IST2021-09-06T04:22:06+5:302021-09-06T04:22:06+5:30
तरावया पार भवसिंधु॥ या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराज मानवजातीला योग्य प्रकारचे जीवन जगण्यासाठी बोध करतात. मानवाने जीवन जगत ...

नाशिवंत देह जाणार सकळ
तरावया पार भवसिंधु॥
या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराज मानवजातीला योग्य प्रकारचे जीवन जगण्यासाठी बोध करतात. मानवाने जीवन जगत असताना, या भवसागरातून तरून जायचे असेल, म्हणजेच संसाररूपी दुःखाच्या गर्तेत सुखरूपी आनंद मिळवायचा असेल, तर प्रत्येक क्षणाला आपली सद्सद्विवेक
बुद्धी जागृत ठेवून विचार करायला हवा. ‘कारण’ दु:ख बांधवडी आहे, हा संसार सुखाचा विचार नाही कोठे अथवा संसार दुःखामुळे चहुकडे... विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, जो देखें वों दुःखिया बाबा सुखिया कोई नही रें, या जगात कुणीच सुखी नाही.
म्हणून एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ किंवा माणुसकी धर्माप्रमाणे आचरण करावे.
ज्ञानेश्वरीमधील माउलींच्या ओवीप्रमाणे-
‘जे-जे उपजें ते-ते नांशे, नाशिले पुनरूपी दिसें, हे घटिका यंत्र जैसें परिभ्रमें गां’
प्रत्येक मानवाचा देह हा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंच महाभूतांपासून बनलेला आहे. तो एक दिवस त्यांच्या मध्येच विलिन होणार आहे व देह हे काळाचे... धन कुबेराचे येथे मानवाचे काय आहे, म्हणून मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करूनि मरावे. या संतांच्या अभंगाप्रमाणे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावधानतेचा इशारा देताना, संत मानवाला योग्य चिंतन करण्याचा सल्ला देतात. चिंतनाचे एकूण चार प्रकार आहेत.
विषय चिंतन : यात शब्द, स्पर्श, रूप रस, गंध या पंचविषयांत मनुष्य गुंतून पडतो. व्यर्थ चिंतन : कसे होते? कसे झाले? काय होईल? हे चिंतन काय कामाचे. परदोष चिंतन : यांत दुसऱ्यांच्या दोषांचेच चिंतन केले जाते. मात्र, स्वतःच्या दोषांकडे दुर्लक्ष केले जाते. येथेच मानवाची फसगत होते. भग्वद्चिंतन : म्हणजेच नामचिंतन होय. परमात्माचे चिंतन होय व हेच चिंतन महत्त्वाचे आहे. यामुळेच मानवाची प्रवृत्ती नामी बनते व ‘कोहं कोहं’ म्हणजे मी कोण आहे? असा प्रश्न निर्माण होऊन अहं ब्रह्मास्मीची प्रचिती येते. या इहलोकांच्या म्हणजेच संसारातील सर्व संबंधितांच्या मतलबी व्यवहारामध्ये स्वतः डोळ्यामधे अज्ञानरूपी धूर भरून राहू नये. कारण जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. अंतः या काळीचे नाही कोणी. म्हणून संसाराच्या मोह पाशात गुंतून न राहता, स्वतःसह समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करावा, असा इशाराच संत देतात.
बाळकृष्ण महाराज चव्हाण, वरणगांव.