जळगावकरांनो चला रक्तदान करा, रुग्णांचे प्राण वाचवूया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:50+5:302021-07-02T04:12:50+5:30
सिकलसेल, थॅलसेमिया रुग्णांना रक्त मिळेना, नॉन कोविड यंत्रणेत समस्या वाढणार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाला सुरुवात झाली आणि ...

जळगावकरांनो चला रक्तदान करा, रुग्णांचे प्राण वाचवूया
सिकलसेल, थॅलसेमिया रुग्णांना रक्त मिळेना, नॉन कोविड यंत्रणेत समस्या वाढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाला सुरुवात झाली आणि त्याचा फटका हा रक्तसंकलनाला बसला. कोविडच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती गंभीर बनली.
त्यामुळे सध्या जळगाव शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची स्थिती पुरेशी नाही. ओ निगेटिव्ह या गटाच्या रक्ताच्या बाटल्या जिल्ह्यात फारच
कमी आहेत. त्यामुळे रक्ताचे आजार असलेल्या सिकलसेल, हिमोफिलिया आणि विशेषत: थॅलसेमियाच्या रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी
अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
त्यामुळे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीदिनी २ जुलैपासून लोकमत आयोजित रक्तदान शिबिरात अधिकाधिक
रक्तदात्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाची पहिली लाट ऑक्टोबरमध्ये ओसरायला सुरुवात झाली होती. मात्र
पुन्हा फेब्रुवारीत दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोनामुळे रक्ताची मागणी नसली तरी खासगी रुग्णालयांमध्ये
रक्ताची मागणी वाढत आहे. प्रसुती, अपघात, अत्यावश्यक शस्त्रक्रिया, थॅलसेमिया आणि सिकलसेल या रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे.
————-
कोट -
सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत: पुढे येऊन रक्तदान करावे. कोरोना काळात अनेकांना वेळेवर रक्त मिळू शकलेले
नाही. ही परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ नये यासाठी दात्यांनी पुढे यावे
- अनिल अडकमोल, जिल्हाध्यक्ष, रिपाई.
कोट -
गेल्या काही दिवसांमध्ये रक्ताची टंचाई असल्याचे समोर येत आहे. रक्त दिल्याने अनेकांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे दात्यांनी पुढे यावे,
आणि रक्तदानात सक्रिय सहभागी व्हावे.
- डॉ. विलास नारखेडे, अध्यक्ष पवन चॅरिटेबल ट्रस्ट
कोट -
आपण केलेले रक्तदान हे कुणाचातरी जीव वाचवू शकते. आता कोविडच्या काळात रक्ताचा तुटवडा व आगामी काळात वाढणारी
मागणी लक्षात घेता, यात तरुणांचा अधिक सक्रिय सहभाग असावा. सर्वांनीच रक्तदानासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे.
- विराज कावडिया, संस्थापक अध्यक्ष, युवाशक्ती फाऊंडेशन
———————
प्रमुख रक्तपेढ्यांची स्थिती
रक्तगट रेडक्रॉस गोळवलकर जीएमसी
ए ( ) ०५ ०१ २८
ए(-) ०२ ०४ ०३
बी( ) १० ३७ ३६
बी(-) ०५ १० ०१
एबी( ) १४ ०२ १०
एबी(-) ० ०० ०१
ओ( ) ०५ १० ३१
ओ(-) ०१ ०७ ०२
निगेटिव्ह रक्ताचा तुटवडा
जिल्ह्यातील प्रमुख रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. त्यात गुरुवारी प्रमुख रक्तपेढ्यांमध्ये निगेटिव्ह रक्तगटाच्या रक्ताची कमतरता होती.
यात ओ निगेटिव्ह रक्ताच्या मोजकाच साठा शिल्लक होता. बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीत १३० युनिट रक्त असले
तरी त्यातील बहुतेक रक्तांच्या बॅगची नीट चाचणी करण्यात आलेली नव्हती.