जळगाव : वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांच्या तक्रारी महावितरणकडे प्राप्त झाल्यामुळे, महावितरण प्रशासनातर्फे वेळोवेळी कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे. मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या ग्राहकांचे थेट मीटर जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दिलेला दंड भरण्यासाठी तीन ते चार दिवसांचा अवधी देण्यात येत असून, दिलेल्या मुदतीत दंड न भरणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येत आहे. जळगाव शहरात आतापर्यंत महावितरणतर्फे ५६७ वीज चोरांवर कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांत महावितरणतर्फे आकडे टाकणाऱ्यांवर कारवाई मोहीम सुरू केल्यानंतर आता, वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांवर कारवाई मोहीम सुरू केली आहे. गेल्या महिन्यात जळगाव शहरातील मेहरून, सुप्रीम कॉलनी, आदर्श कॉलनी या भागातील अनेक नागरिकांचे मीटर तपासण्यात आले. यामध्ये २५ ग्राहक मीटरमध्ये फेरफार करत असल्याचे आढळून आले होते. महावितरणतर्फे या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांचे मीटरही जप्त करण्यात आले होते. तसेच जिल्हाभरात अशा प्रकारची मोहीम महावितरणतर्फे राबविण्यात येत असून, दिलेला दंड न भरणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. महावितरणच्या या मोहिमेमुळे वीज चोरांचे दाबे चांगलेच दणदणाले आहेत.
इन्फो :
आठ महिन्यांत झालेली कारवाई
महिना ग्राहक वसूल दंड
जानेवारी ८३ १६ लाख ७९ हजार
फेब्रुवारी १६८ २७ लाख ७९ हजार
मार्च ७९ १४ लाख
एप्रिल ३८ ७ लाख १५ हजार
मे ६ १ लाख ३४ हजार
जून ४ ९० हजार
जुलै ३६ २८ लाख ८५ हजार
ऑगस्ट १५९ ५९ लाख ६ हजार