शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पिके धोक्यात आलेली आहेत. उभ्या असलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आमदार अनिल भाईदास पाटील यांनी पाहणी केली.
पातोंडा भागातील शेतजमीन पावसामुळे पूर्ण पाण्याने भरून जाते. गेल्या वर्षी आमदारांनी या भागातील शेतजमिनींचा सर्व्हे करण्यासाठी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. पातोंडा व सावखेड्याच्या नाल्यांमध्ये हे पाणी कसे वळवता येईल तसेच त्या ठिकाणी असलेल्या दोन पाटचाऱ्यांचे सिंचन विभागाच्या माध्यमातून खोलीकरण करता येईल व रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारींच्या माध्यमातून शेतातील पाणी बाहेर कशा प्रकारे काढता येईल याबाबत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
शासनाच्या नियमानुसार ६५ मि.मी. पेक्षा पाऊस जास्त असला तर, शेतातील पिकांचे पंचनामे करता येतात मात्र या भागात पर्जन्यमान कमी असले तरी पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहाते व पिकांचे नुकसान होते. यामुळे या भागाच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून या शेतजमिनींचा पंचनामा करण्यात यावा, तसा प्रस्ताव व निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे.
पाणी निचरा होण्यासाठी नियोजन
भविष्यात या भागातील शेतजमिनीतील पाण्याचा निचरा कसा होईल व या भागातील लोकांना न्याय कसा मिळेल याचा विचार करून संबंधित विभागातील यंत्रणेशी संपर्क झालेला आहे. लवकरात लवकर या भागाचे सर्वेक्षण होऊन व संबंधित विभागांची बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल असे आमदारांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले. यावेळी परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.