रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ९० टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 21:34 IST2020-10-08T21:34:35+5:302020-10-08T21:34:54+5:30
दोन लाखावर चाचण्या : ४५ हजार ३१० रुग्ण बरे

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ९० टक्क्यांवर
जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान कालावधीत जिल्ह्यात त्वरीत शोध, त्वरीत निदान आणि त्वरीत उपचार (ट्रेस, टेस्टींग, ट्रीटमेंट) या त्रिसुत्रीचा अवलंब केला जात आहे. या त्रिसुत्रीमुळे बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. शोधलेल्या व्यक्तींची त्वरीत तपासणी करण्यात येत आहे. त्यांच्या आजाराचे निदान करुन बाधित आढळलेल्या रुग्णांवर त्वरीत उपचार केले जात आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या बाधित रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेले आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानकारक बाब असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ४५ हजार ३१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.२२ टक्क्यांवर पोहोचले आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ७०१ ॲक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून पैकी १ हजार ६७९ रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २ हजार ६८६ रुग्ण हे लक्षणे नसलेले असून अवघे १ हजार १५ रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत. जिल्ह्यात सध्या कोविड केअर सेंटरमध्ये १ हजार ७ रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ५३८, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ४७७ रुग्ण उपचार घेत आहेत. तर विलगीकरण कक्षात ३२८ रुग्ण आहेत. जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात येत असल्याने गेल्या वीस दिवसांपासून सलगपणे बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या ६ हजार ४१० ने कमी झाली आहे. ही जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे.
जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनयुक्त बेड तयार झाले आहेत. सद्यपरिस्थितीमध्ये जिल्ह्यात १२ हजार ८५४ बेड असून त्यापैकी २ हजार १९ ऑक्सिजनयुक्त बेड असून ३२२ आयसीयु बेडचा समावेश आहे.
माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानात आरोग्य पथके घरोघरी जाऊन नागरीकांची आरोग्य तपासणी करीत आहेत. या तपासणीत लक्षणे जाणवताच नागरिकांनी तपासणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात आरटी-पीसीआरद्वारे ९६ हजार ७२४ तर रॅपिड ॲन्टीजेन टेस्टद्वारे १ लाख २० हजार ५०८ अशा एकूण २ लाख १७ हजार २३२ संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी १ लाख ६५ हजार ३५३ चाचण्या निगेटिव्ह तर ५० हजार २२२ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. इतर अहवालांची संख्या १ हजार १२३ असून ५३४ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात एका दिवसात २ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून आतापर्यंत १ हजार २११ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर हा २.४१ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनास यश आले आहे.