जळगाव तालुक्यात एकाच ठिकाणी रुग्ण; अन्य गावे कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:21 IST2021-08-19T04:21:17+5:302021-08-19T04:21:17+5:30
जळगाव : जिल्हाभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे समाधानकारक चित्र गेल्या दोन महिन्यांपासून कायम आहे. यात विशेष बाब ...

जळगाव तालुक्यात एकाच ठिकाणी रुग्ण; अन्य गावे कोरोनामुक्त
जळगाव : जिल्हाभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे समाधानकारक चित्र गेल्या दोन महिन्यांपासून कायम आहे. यात विशेष बाब म्हणजे जळगाव तालुक्यातील ८७ गावांपैकी केवळ जळगाव खुर्द शिवारातील गोदावरी मेडिकल कॉलेजमध्येच रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३३वर आलेली आहे.
जिल्हाभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला होता. मार्च, एप्रिलदरम्यान रुग्णसंख्या तसेच मृतांची संख्या प्रचंड वाढली होती. यात जळगाव शहरासह तालुक्यातही अनेक रुग्ण आढळून येत होते. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १,४२,६७० असून, यापैकी १,४०,०६० रुग्ण बरे झाले आहेत. २५७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९८.१७ वर पोहोचला आहे. जळगाव तालुक्यातही मध्यंतरी रुग्णसंख्या वाढली होती. मात्र यंत्रणेला त्यावर नियंत्रण मिळविण्यास यश मिळाले आहे.
गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यात डेल्टा प्लस या नव्या विषाणूचे १३ रुग्ण आढळून आले आहेत, मात्र हे सर्व रुग्ण बरे झालेले असून, त्यातील कोणताच रुग्ण गंभीर झालेला नसल्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे. शिवाय जेव्हा हे रुग्ण बाधित झाले तेव्हापासून जिल्ह्यात मोठी रुग्णवाढ किंवा मृत्यूवाढ झालेली नसल्याने हा एक दिलासा आहे.
जिल्ह्यात सरासरी तीन हजार चाचण्या
जिल्हाभरात सरासरी तीन हजार चाचण्या केल्या जात आहेत. काही दिवसांपासून आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या घटली आहे. अँटिजन चाचण्यांची संख्या रोज कमी जास्त होत आहे. पॉझिटिव्हिटी बघितली असता आताही जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी ही १ टक्क्यांच्या खालीच नोंदविली जात आहे. आता केवळ आरटीपीसीआर अहवालामधील बाधित रुग्ण पॉझिटिव्हिटीसाठी ग्राह्य धरले जात आहेत. अनेकवेळा त्याची शून्य टक्के नोंद होत आहे.
या तालुक्यात डेल्टा प्लस रुग्ण
पारोळा ८
जामनेर ३
जळगाव शहर २
दुसऱ्या लाटेतील कोरोनामुक्त गावे
१ नशिराबाद
२ म्हसावद
३ असोदा
४ रायपूर
रुग्ण असलेले गाव
जळगाव खुर्द
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्ण
जळगाव शहर ५
जळगाव ग्रामीण १
भुसावळ ५
अमळनेर २
चोपडा २
पाचोरा ०
भडगाव १
धरनगाव ०
यावल ०
एरंडोल ०
जामनेर १
रावेर ०
पारोळा ०
चाळीसगाव १
मुक्ताईनगर ०
बोदवड १५