लहान स्थानकांना प्रतीक्षा पॅसेंजर गाड्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:22 IST2021-09-10T04:22:13+5:302021-09-10T04:22:13+5:30

वासेफ पटेल भुसावळ : भारतीय रेल्वेचा आत्मा ‘मध्य रेल्वे’, रेल्वेचे प्राण म्हणजे ‘भुसावळ रेल्वे विभाग’ आहे. मात्र या विभागातील ...

Passenger trains waiting at smaller stations | लहान स्थानकांना प्रतीक्षा पॅसेंजर गाड्यांची

लहान स्थानकांना प्रतीक्षा पॅसेंजर गाड्यांची

वासेफ पटेल

भुसावळ : भारतीय रेल्वेचा आत्मा ‘मध्य रेल्वे’, रेल्वेचे प्राण म्हणजे ‘भुसावळ रेल्वे विभाग’ आहे. मात्र या विभागातील अनेक पॅसेंजर गाड्या अद्यापही बंद असल्याने पॅसेंजर थांबत असणाऱ्या लहान स्थानकांवर प्रवाशांअभावी शुकशुकाट दिसून येत आहे. असे असले तरी या स्थानकावरून मालगाड्या व एक्स्प्रेस गाड्या धावत असल्याने अधिकारी व कर्मचारी यांना या स्थानकावर काम करावेच लागत आहे.

सुरुवातीस कोरोनामुळे लाॅकडाऊन पुकारल्यावर देशभरातील एक्स्प्रेस ,मेल, पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. कोरोना काळात रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे प्रवासी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती, मात्र याच काळात रेल्वेने मालवाहतूक, किसान व पार्सल गाड्या सुरू ठेवल्या होत्या. त्यानंतर रुग्ण संख्या कमी होऊ लागल्याने अनलाॅक प्रक्रियेला प्रारंभ झाल्याने रेल्वे मंत्रालयाने हळूहळू विशेष एक्स्प्रेस नावाने ३० ते ४० टक्के तिकिटाचे दर वाढवून गाड्या सुरू केल्या. यादरम्यान मात्र गरिबांना प्रवासासाठी परवडणाऱ्या पॅसेंजर गाड्या अद्यापही बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे नाईलाजाने सर्वसामान्यांना विशेष एक्स्प्रेसने प्रवास करताना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

या पॅसेंजर गाड्या आहेत बंद

भुसावळ -देवळाली, भुसावळ -नागपूर, भुसावळ- अमरावती, भुसावळ - कटनी, भुसावळ -मुंबई, भुसावळ -अमरावती भुसावळ- नागपूर इंटरसिटी मार्गे इटारसी. या पॅसेंजरचा समावेश आहे. तर भुसावळ - पुणे (हुतात्मा एक्स्प्रेस) ही परवडणारी व अधिक डिमांड असलेली गाडीही बंद आहे.

भुसावळ ते मनमाड दरम्यानची लहान स्थानके

भादली, शिरसोली, म्हसावद ,माहिजी, परधाडे, गाळण ,नगरदेवळा, कजगाव, वाघळी, हिरापूर, रोहिणी, नायडोंगरी, पिंपरखेड ,नांदगाव, पांजण, हिसावळ, पानेवाडी.

भुसावळ ते खंडवा दरम्यानची लहान स्थानके

दुसखेडा, निंभोरा, वाघोदा, अशीरगढ रोड ,चांदणी, मंडवा, सागफाटा, दोंगा डोंगरगाव, काहोड.

भुसावळ ते शेगाव दरम्यानची लहान स्थानके

आचेगाव, कोल्हाडी, खामखेड, वडोदरा, बिस्वा ब्रिज, खुमगाव बुरटी, श्रीक्षेत्र नागझरी,

वेस्टर्न रेल्वेच्या पॅसेंजर सुरू तर, मध्य रेल्वेच्याच का बंद?

वेस्टर्न रेल्वेच्या सुरत- भुसावळ या दोन पॅसेंजर गाड्या सकाळ व रात्रीच्या सुरू आहेत. मात्र मध्य रेल्वेच्या भुसावळ स्थानकावरून सुटणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या बंद आहेत. कोरोना काळात वेस्टर्न रेल्वे पॅसेंजर सुरु केल्या आहेत तर, मध्य रेल्वेकडून पॅसेंजर का सुरु केल्या जात नाही?, हा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडला आहे.

पॅसेंजर गाडी सुरू होती तेव्हा पैशांची बचत व्हायची. तसेच व्यवसाय व उद्योगातून दोन पैसे शिल्लक राहायचे. मात्र आता बसने महागडा प्रवास करणे शक्य होत नाही. यामुळे गावातच मिळेल ते काम करावे लागते.

- राहुल चौधरी, ग्रामीण भागातील प्रवासी

भुसावळ विभागातून अकोला, खंडवा व मनमाड या दिशेने एक तरी पॅसेंजर गाडी सुरू व्हावी याकरिता प्रस्ताव देण्यात आले आहे. मात्र अद्याप पॅसेंजर गाड्या सुरू करण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून कुठल्याही प्रकारचे निर्देश प्राप्त झाले नाही.

- बी अरुणकुमार, वाणिज्य व्यवस्थापक,

भुसावळ विभाग

Web Title: Passenger trains waiting at smaller stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.