अपघातात एकुलता मुलगा गेला, आधार हरवला! सेंधव्याजवळील घटना
By विलास.बारी | Updated: July 16, 2023 21:43 IST2023-07-16T21:42:52+5:302023-07-16T21:43:05+5:30
अपघातात ठार झालेल्या तरुणावर अंत्यसंस्कार, गंभीर रुग्णाला इंदूरला हलविले

अपघातात एकुलता मुलगा गेला, आधार हरवला! सेंधव्याजवळील घटना
विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: येथून सिहोर येथे जाणाऱ्या तरुणांच्या वाहनाचे टायर सेंधवा जवळ फुटून झालेल्या अपघातात ठार झालेल्या सूरज रामेश्वर जामोळकर (२४, रा. तुकाराम वाडी) या तरुणावर रविवारी जळगावात अंत्यसंस्कार करण्यात आले. सूरज हा एकुलता एक मुलगा, त्याच्या जाण्याने जामोळकर कुटुंबाचा आधार हरवला आहे. यातील प्रकृती चिंताजनक असलेल्या तरुणाला इंदूर येथे हलविले असून इतर तीन तरुणांवर जळगावात उपचार सुरू आहे.
जळगाव शहरातील तुकारामवाडीत सूरज जामोळकरसह त्याचे मित्र शनिवार, १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता चारचाकी वाहनाने (एम एच १९, डीजे ७७७३) सिहोर येथे जाण्यासाठी निघाले. त्या दरम्यान संध्याकाळी सेंधवाजवळ वाहनाचे टायर फुटले व हे वाहन उलटले. या अपघातात वाहनातील सहापैकी सूरज जामोळकर हा तरुण जागीच ठार झाला. रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह जळगावात आणण्यात आला. त्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
एकुलता एक मुलगा
मयत सूरज याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. त्याचे वडील एलईडी दिवे विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने जामोळकर कुटुंबाचा आधारच हरवला आहे. त्याचा मृतदेह आणल्यानंतर कुटुंबाचा आक्रोश मन हेलावणारा होता.