शिवभोजन केंद्रांवर केवळ पार्सल सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST2021-04-06T04:16:24+5:302021-04-06T04:16:24+5:30
जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने स्वस्त धान्य दुकाने व शिवभोजन केंद्र यांच्यासाठी नियमावली लागू ...

शिवभोजन केंद्रांवर केवळ पार्सल सुविधा
जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने स्वस्त धान्य दुकाने व शिवभोजन केंद्र यांच्यासाठी नियमावली लागू करण्यात आली असून त्यानुसार शिवभोजन केंद्रांवरून आता केवळ पार्सल सुविधा राहणार आहे. तसेच स्वस्त धान्य दुकानावर ऑनलाईन पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार स्वस्त धान्य दुकाने व शिवभोजन केंद्र यांच्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने सोमवारी सूचना देण्यात आल्या. याविषयी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, स्वस्त धान्य दुकानदार, शिवभोजन केंद्रचालक यांना पत्र देण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांवर केवळ पार्सल सुविधा उपलब्ध राहणार असल्याचे म्हटले आहे.
याशिवाय स्वस्त धान्य दुकानांविषयी सूचना देताना आठवड्याचे सर्व दिवस स्वस्त धान्य दुकाने ठरवून दिलेल्या वेळेत सुरू राहतील तसेच या कालावधीत धान्याचे वितरण करावे अशा सूचना स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय दुकानदार आणि लाभार्थी यांच्या आवश्यकतेनुसार एकमेकांच्या सोयीसाठी ऑनलाईन पेमेंटचा पर्यायदेखील उपलब्ध करून दिला आहे.
स्वस्त धान्य दुकान व शिवभोजन केंद्र यांच्यासाठी जारी केलेल्या सूचनांमध्ये गर्दी टाळावी, मास्क वापरणे बंधनकारक, सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, ४५ वर्षांहून जास्त वय असणाऱ्या सर्वांनी लसीकरण करून घ्यावे व जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.