लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पंचायत राज समितीचा दौरा दोन ते तीन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला असून, ही समिती आता २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान जि. प. च्या कामांचा आढावा घेणार आहे. साने गुरुजी सभागृहात याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारीही सामान्य प्रशासन विभागात सर्व विभागांकडून माहिती घेण्याचे काम सुरू होते.
पंचायत राज समिती सुरुवातीला २२ ते २५ दरम्यान जि. प. च्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात येणार होती. मात्र, या दिवशी एसटी कमिटीची मंत्रालयात साक्ष असल्याने समितीचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. समिती पहिल्या दिवशी सीईओंकडून माहिती घेणार असून दुसऱ्या दिवशी तालुकास्तरांवर भेटी देऊन कामांचा आढावा घेणार आहे. समितीसमोर कामांच्या सादरीकरणासाठी अधिकारी व कर्मचारी वर्ग पूर्णत: व्यस्त असून शनिवारी सामान्य प्रशासन विभागात विविध विभागांनुसार आढावा घेतला जात होता.
रस्त्याचा प्रश्न कायम
समितीमध्ये राज्यभरातील २० ते २५ आमदारांचा समावेश राहणार असून, ते जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात माहिती घेणार असल्याची माहिती आहे. मात्र, समितीला जि. प. त येण्यासाठी नेमका रस्ता कोणता, असा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर कायम आहे. कारण जि. प.चा मुख्य रस्ता पूर्णत: उद्ध्वस्त असून या ठिकाणाहून दुचाकी नेण्यासाठीही कसरत करावी लागते. अशा स्थितीत हा प्रश्न अधिकाऱ्यांची डोकेदुखी ठरू शकतो.